Devendra Fadnavis  Pudhari
मुंबई

Devendra Fadnavis : संविधान मानत असाल तर संसदेत चर्चा करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्यातील सर्वांत मोठा परीक्षा घोटाळा उद्धव ठाकरेंच्या काळात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : संविधान मानत असाल आणि तुमच्यात हिंमत असेल तर पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेतील चर्चेला सामोरे जा, पळपुटेपणा सोडा, असे खुले आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राहुल गांधींसह विरोधी नेत्यांना दिले. त्याचवेळी स्वतःचे राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी ठाकरे बंधूंचा मोर्चा असल्याचे सांगतानाच, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडला. तत्कालीन मंत्र्यांपासून अनेकजण त्यात सामील होते. पेपर लीक तर झालेच, शिवाय नापासांना पास करण्याचा पराक्रमही ‘मविआ’ सरकारच्या काळात झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीत निर्णय रस्त्यावर नव्हे, तर संसदेत होतात. जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा, उत्तरे मागा आणि तुमच्याकडे काही चांगल्या संकल्पना असतील तर सरकारला त्या अंमलात आणण्यासाठी भाग पाडा. परंतु, आंदोलनांच्या आधारे आपली राजकीय पोळी भाजणे बंद करा. विद्यार्थ्यांचे हित चर्चेतूनच साध्य होऊ शकते. विरोधी पक्षांमध्ये संसदेत चर्चा करण्याची हिंमत नाही. कारण, कर्नाटकात पेपर कसा लीक झाला, तेलंगणात कशाप्रकारे गैरव्यवहार झाला, पंजाबमधील ‘आप’ सरकार आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या काळात आठ-आठवेळा पेपर कसे फुटले, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.

विरोधक पळ काढत आहेत

स्वतःच्या राज्यातील घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीने विरोधक चर्चेपासून पळ काढत असून देशात अराजकता पसरवणे हीच त्यांची मानसिकता आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

मोदींच्या घोषणेवर विद्यार्थी खूश आहेत

पेपर लीकप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. ‘नीट’ची पुनर्परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडली असून विद्यार्थी खूश आहेत आणि उत्तीर्ण झाल्यावर आनंद साजरा करत आहेत.

‘यूपीए’ सरकारच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट अवघे ८ हजार कोटी रुपये होते, ते मोदी सरकारने १ लाख ३९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. आयआयटी, एम्स यासारख्या आयकॉनिक संस्थांसह वैद्यकीय, इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन शाखांमधील जागा वाढवून तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ठाकरे बंधू या आंदोलनाच्या निमित्ताने स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात असल्याचे म्हटले. आमच्या सरकारने टीईटीत गैरव्यवहार होत असल्याचे लक्षात येताच परीक्षा होण्यापूर्वीच घोटाळेबाजांना अटक करून कठोर कारवाई केली. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात झालेला घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा स्तर राज्याने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.

आंदोलनामध्ये सर्वप्रकारच्या प्रवृत्ती असतात. अनेक कलाकार चांगल्या भावनेने प्रामाणिकपणे आंदोलनात उतरले आहेत. मात्र, दुर्दैवाने काहीजण या आंदोलनाचा प्रसिद्धीसाठी वापर करत आहेत. रील्स‍ बनवण्यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचा दावाही फडणवीस यांनी सेलिब्रिटींकडून येत असलेल्या मेसेजबद्दल विचारले असता केला.

देशविरोधी शक्तींपासून सावध राहा

आंदोलनाच्या नावाखाली दगडफेक करणारे आणि पोलिसांवर हल्ला करणारे लोक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आलेले नव्हते. या आंदोलनाचा फायदा घेऊन अराजकता माजवणारे हे घटक होते. आंदोलनकर्त्यांनीही अशा देशविरोधी आणि हिंसक प्रवृत्तींपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT