/11 च्या जखमा पुन्हा भळभळल्या pudhari photo
मुंबई

Mumbai train blasts : 7/11 च्या जखमा पुन्हा भळभळल्या

रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेतील सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सोमवारी धक्कादायक निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने 7/11 च्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेतील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने या स्फोटात कुणी डावा हात, तर कुणी उजवा हात, तर कुणी पाय गमावलेल्या मुंबईकरांच्या जखमा पुन्हा भळभळल्या.

सध्या व्हीलचेअरवर असलेले चिराग चव्हाण तेव्हा सांताक्रूझच्या स्फोटात जखमी झाले होते. जोगेश्वरीच्या स्फोटात महेंद्र पितळे यांनी आपला डावा हात गमावला. सध्या कृत्रिम हात बसवून ते आपले काम चालवतात. हंसराज कनोजिया यांनी जोगेश्वरीच्याच स्फोटात आपला पाय गमावला. बोरिवलीतील रमेश नाईक यांनी आपली 27 वर्षांची मुलगी नंदिनी याच स्फोटांमध्ये बोरिवलीत गमावली. असे किती तरी मुंबईकर सोमवारच्या निकालाने व्यथित झाले. शोकसंतप्त झाले.

11 जुलै 2005 चा तो दिवस मुंबईत जुलै महिन्यातल्या इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. काळ्या ढगांनी आकाश भरलेले होते. महेंद्र पितळे हे त्या दिवशी पश्चिम भागातील उपनगरातील विलेपार्ले इथे आपल्या कार्यालयात होते.ते एका स्टुडिओमध्ये डिझायनर म्हणून काम करायचे आणि मुंबईतल्या लाखो लोकांसारखे दररोज लोकल ट्रेनने प्रवास करत.

मी नेहमी सायंकाळी 7:30 ची ट्रेन पकडायचो. पण त्या दिवशी ऑफिसचे काही काम होते, म्हणून मी लवकर निघालो. सव्वासहाच्या आसपासची ट्रेन मी पकडली. सायंकाळी 6:24 वाजता, ट्रेन जोगेश्वरी स्टेशन सोडत होती, त्याचवेळी एक भीषण स्फोट झाला. काही मिनिटांच्या अंतराने एकूण सात ट्रेन्समध्ये स्फोट झाले होते.संध्याकाळी 6:24 च्या आसपास साधारण 6-10 मिनिटांच्या कालावधीत हे स्फोट झाले होते. महेंद्र नशिबाने बचावले, पण त्यांनी आपला डावा हात गमावला. 19 वर्षानंतर अजूनही न्याय मिळाला नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

26/11 चा दहशतवादी हल्ला आमच्या घटनेनंतर, 2008 मध्ये झाला. पण त्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने लवकर निकाल दिला आणि कसाबला 2012 मध्ये फाशी पण झाली. परंतु, आम्हाला मात्र अजूनही असा न्याय मिळालेला नाही, अशी खंत महेंद्र व्यक्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT