मुंबई : विरोधकांनी कितीही टीका केली तरी मुंबईकरांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा आमचा निर्धार बदलणार नाही. बीडीडी चाळींच्या पुनर्विकसित घरांच्या चावी वाटपाचा हा कार्यक्रम म्हणजे आम्ही जे सांगितले ते सत्यात उतरविले हे दाखवून देणारा दिवस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर सभागृहात, म्हाडाने बीडीडी चाळींच्या जागेवर बांधलेल्या 556 पुनर्वसन सदनिकांच्या चाव्या रहिवाशांच्या हाती गुरुवारी देण्यात आल्या. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 16 रहिवाशांना मान्यवरांच्या हस्ते चावी व मिठाई देण्यात आली. या समारंभाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महायुतीच्या या तिन्ही नेत्यांनी धारावीचा प्रकल्प महायुती सरकार मार्गी लावणारच,असा निर्धार व्यक्त केला.
ही स्वप्नपूर्तीची सुरुवात
हा चावी वितरणाचा कार्यक्रम म्हणजे महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर उमटविलेली मोहर आहे. बीडीडी चाळवासीयांना पुनर्विकासातून साकारलेल्या 556 सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बीडीडी चाळवासीयांना मिळालेली घरे म्हणजे केवळ बांधकाम नसून, पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक आहे. हा ठेवा पुढील पिढीला द्यायचा आहे त्यामुळे कोणीही यातील घर विकू नये, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, बीडीडी चाळी केवळ घरे नसून मुंबईच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास आहे.
विविध कारणामुळे 20-25 वर्षे हा प्रकल्प रखडला. या पुनर्विकासातील दीर्घकाळ असलेले अडथळे आमच्या सरकारने दूर करत सामान्य मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे घर देण्याच्या दिशेने पाऊले टाकले. या प्रकल्पात विकासक न नेमता, थेट म्हाडामार्फत हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. जागतिक निविदा काढून काम हाती घेण्यात आले. जागेचा सर्वोत्तम वापर, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन अशा आधुनिक सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या सहकार्याने अडचणी दूर झाल्या. आता पहिल्या टप्प्यात सुमारे 556 कुटुंबांना चाव्या देण्यात येत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून, वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी प्रास्ताविकात हा आशियातील सर्वात मोठा शहरी गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प असल्याचे सांगितले. म्हाडाने आतापर्यंत 9 लाख घरांचे वाटप केले आहे. पुढील पाच वर्षात 8 लाख घरांचे निर्माण करण्याचे नियोजन केल्याचेही ते म्हणाले.
यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, खासदार मिलिंद देवरा, आमदार सुनील शिंदे, कालिदास कोळंबकर, सचिन अहिर, महेश सावंत, माजी आमदार सदा सरवणकर, किरण पावसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना साठे यांनी तर आभार मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. बोरीकर यांनी मानले. कार्यक्रमास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, अधिकारी, रहिवासी उपस्थित होते.
धारावी पुनर्विकासाचा निर्धार
बीडीडीची घोषणा केली तेव्हाही बिल्डरांसाठी हे सर्व सुरू असल्याची टीका तेव्हाही केली गेल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावी पुर्नविकास प्रकल्पही मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. धारावीच्या निमित्ताने एक सर्वसमावेशक औद्योगिक वसाहतच उभी राहणार आहे. आमची भूमिका ही विकासाची आणि सर्वसमावेशक आहे. विकासात कोणतीही आडमुठी भूमिका घेत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
10 लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर एक ‘नवीन शहर’ म्हणून उभारला जाणार आहे, असेही ते म्हणाले. बीडीडी ही तर केवळ सुरुवात असून मुंबई बाकी आहे, धारावीकरांनी चांगल्या घरात राहायचे नाही का, धारावीकरांचे जीवनमान चांगले बनवायचे नाही का, त्यांना चांगले जीवन जगण्याचा अधिकार नाही का, अशी प्रश्नांची सरबत्ती एकनाथ शिंदे यांनी केली. जशी बीडीडीची स्वप्नपूर्ती झाली तसेच धारावीचे स्वप्नही पूर्ण होणार आणि ते महायुतीचे सरकार करूनच दाखविणार. कोणी काहीही म्हणो,परंतु धारावी प्रकल्प पूर्ण करून दाखविणार असा निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखविला.
पुनर्विकासाचा नवा आदर्श : शिंदे
मागील तीन-चार पिढ्यांपासून बीडीडी चाळीत राहणार्या हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. केवळ घर नव्हे, तर उत्तम दर्जा, आधुनिक सुविधा आणि दीर्घकालीन टिकाऊपणा हे या पुनर्विकासाचे वैशिष्ट्य ठरत आहे. हा प्रकल्प पुनर्विकासाचा नवा आदर्श आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या इमारती पुढील 100 वर्षे टिकाव्यात, 12 वर्षे देखभाल खर्च मुक्त राहाव्यात यासाठी उत्कृष्ट साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तर, या सदनिकांचे मालकी हक्क महिलांच्या नावे असावे, यासाठी काही तरतूद करावी, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
मोहात पडून घरे विकू नका : अजित पवार
बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण हा भावनिक क्षण आहे. जुन्या 160 चौरस फूट घरांतून आता 500 चौरस फूट सुसज्ज घरात जायला मिळत आहे. चावी हातात घेतलेल्या प्रत्येक रहिवाशाच्या चेहर्यावर समाधानाचे हास्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. रहिवाशांनी घरे कोणत्याही मोहात न पडता विकू नये, ही आपल्या कष्टाची कमाई आहे आणि ती जपावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले. मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना तसेच पुनर्विकासाच्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या प्रकल्पातील दर्जेदार बांधकाम, जागेचा सुयोग्य वापर आणि रहिवाशांच्या विश्वासाला पात्र राहण्याचे काम केले गेले आहे.
बीडीडी चाळवासीयांना मिळालेली घरे म्हणजे केवळ बांधकाम नसून, पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक आहे. हा ठेवा पुढील पिढीला द्यायचा आहे. त्यामुळे कोणीही यातील घर विकू नये... बीडीडी चाळी केवळ घरे नसून मुंबईच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास आहे.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मागील तीन-चार पिढ्यांपासून बीडीडी चाळींत राहणार्या हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. या सदनिकांचे मालकी हक्क महिलांच्या नावे असावे, यासाठी काही तरतूद करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री