मुंबई: “निवडणूक आयुक्तांच्या निवडणुका घ्या म्हणणारे उद्या महापालिका आयुक्तांच्या निवडणुका घ्यायला सांगतील. पण दुसऱ्यांवर बोट दाखवण्याआधी स्वतःकडे पाहा; तुम्ही तरी कुठे थेट जनतेतून निवडून आला होतात? तुम्ही तर मागच्या दाराने विधानपरिषदेत आलात आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालात! खरी वोटचोरी तर २०१९ मध्येच झाली होती,” अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक आणि बोचरी टीका केली. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यात शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेताना लंडन दौरा, शेतकरी प्रश्न, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राहुल गांधी यांच्यावर एकापाठोपाठ एक तोफ डागली.
आपल्या परदेश दौऱ्यावरील टीकेला सडेतोड उत्तर देताना शिंदे म्हणाले, “मी लंडनला जाऊन राज्याचा डंका वाजवून आलो. पण विरोधकांची अवस्था अशी झाली आहे की, मी लंडनला गेलो तरी यांच्या पोटात दुखतं, इंग्रजीत बोललो तरी पोटदुखी, आणि साताऱ्याला माझ्या गावी गेलो तरी मळमळ सुरू होते! शेतकरी कुटुंबातील एक सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत पोहोचला, याचा विरोधकांना एवढा आकस आणि जळफळाट का?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांवर पलटवार करताना शिंदे यांनी राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. “संकटाच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. विरोधक राजकारण करत असले, तरी आम्ही बळीराजाच्या पाठीशी ठाम आहोत. राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “एकेकाळी भारताला धमकावणारा पाकिस्तान आज जगात कटोरा घेऊन भीक मागत फिरत आहे. ही बिकट परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर धोरणांमुळेच निर्माण झाली आहे. भारताचा मान आज जागतिक स्तरावर शिखरावर पोहोचला आहे.”
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल करताना शिंदे यांनी थेट रावण दहनाची उपमा दिली.
संविधान खतरे मे ही निव्वळ खोटी घोषणा : “सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर संशय घ्यायचा, संस्थांवर हल्ले करायचे आणि ‘संविधान खतरे मे’ अशी खोटी घोषणाबाजी करून देश तोडायला निघायचे, हाच यांचा खरा अजेंडा आहे.”
दहा तोंडाचा रावण : “‘इंडिया’ आघाडी म्हणजे १० तोंडाचा रावण आहे. या अहंकारी आणि गोंधळलेल्या रावणाचे जनतेने दहन केले पाहिजे.”
रेजीम चेंज जनतेच्या हातात : “पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे कसले देशप्रेम? तुम्ही कसली ‘रेजीम चेंज’ची (सत्ता बदलाची) भाषा करता? सत्ता बदलणे हे जनतेच्या हातात असते आणि देशातील जनतेने तुम्हाला सलग तीन वेळा साफ नाकारले आहे.”
आणीबाणीच्या खोट्या आरोपांची चिरफाड : “देशभरात दररोज रस्ते अडवून आंदोलने करता आणि वरून बोंब मारता की देशात आणीबाणी आहे; मग जर आणीबाणी असती तर अशी आंदोलने करता आली असती का?” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.