Delhi-Mumbai Expressway Accident: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणारी ही बस कराडिया परिसरात रस्त्यावरून खाली कोसळली. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहाहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
एएनआयच्या वृत्तानुसार, पोलीस ठाण्याचे प्रभारी नंद सिंह यांनी सुरुवातीला चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र, जिल्हाधिकारी पीयूष सामरिया यांनी या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये भोपाळमधील २१ प्रवासी होते. त्यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. हे सर्वजण भोपाळहून खाटूश्यामजींच्या दर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान कोटा जिल्ह्यातील कराडिया परिसरात बसचा अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की बस एक्सप्रेसवेवरून खाली कोसळली. दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आणि जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर कोटा येथील एमबीएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी पीयूष सामरिया आणि कोटा रेंजचे पोलीस महानिरीक्षक हरेंद्र महावर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.