मृणालिनी नानिवडेकर
मुंबई ः गेल्या अकरा वर्षांची शांतता संपून दिल्ली पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्याचे लक्ष्य झाल्याचे तपासात जवळपास मान्य झाले असतानाच यंत्रणेने मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. पुलवामातील ‘डॉक्टर्स ऑफ डूम’ गटाशी मुंबईतील कुणाचा संबंध आहे काय, याची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत सीमेपलीकडील ड्रग्ज पेडलर्सना पकडले होते. त्यांचा अतिरेकी मोड्यूलशी संबंध असावा, अशी शक्यता काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा ठावठिकाणा शोधणे आवश्यक असल्याचे नमूद केले जाते आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईत पकडलेल्या या ड्रग्ज पेडलर्सचे दहशतवादी मोड्यूलशी, आय. एस. आय.शी संबंध आहेत काय, हे पाहाण्याची गरज आहे. अत्यंत वरिष्ठ स्तरावरील माहितीनुसार, मुंबईतील काही मंडळींचे आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी या घटनेबाबत जवळचे संबंध आहेत. शंका येत असल्याने चौकशी करा असे सांगण्यात आले आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबई हे संवेदनशील शहर असल्यामुळे या महानगरातील प्रत्येक घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी गेल्या 24 तासांत युद्ध पातळीवर बैठका सुरू आहेत. शासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून, जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दिल्ली प्रकरणाशी संबंध असेल, हे लक्षात घेता मुंबईत अधिकच जागरूक राहण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपूर्वी तरुणांनी दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या प्रकारामुळे ही अलर्ट मोहीम अधिकच प्रभावीपणे राबवावी लागेल, असे मत मंगळवारी झालेल्या गृह खात्याच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात मुंबई पोलिस, तसेच महाराष्ट्र पोलिसांनी विविध बैठका घेत काही गोष्टींचा आढावा घेतला. मुंबई पुन्हा एकदा हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकते, असे निरोप आहेत.
प्रारंभिक अंदाजानुसार जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने बुद्धिमान तरुणांचा वापर करत दिल्लीतला हल्ला घडवून आणल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मुंबईतही अशाच प्रकारची भीती गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केली जात असून, यंत्रणा कमालीच्या सतर्क आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात स्लीपर सेल्स सक्रिय झाले असल्याची भीती गृहीत धरून सुरक्षेची आखणी करण्यास सुरुवात झाली आहे. तबलीगी जमातचे मेळावे, तसेच इंडियन मुजाहिद्दीनच्या माध्यमातून सुरू झालेल्या चळवळी लक्षात घेता अल्पसंख्याक तरुणांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची भीती वेगवेगळ्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
मालेगाव स्फोटानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अल्पसंख्याक युवक स्लीपर सेलमध्ये सहभागी झाले. परभणीतील काही घरांमधून बेपत्ता होणारे युवक साकीब नाचन व झकिर नाईक यांच्या संस्थांना मिळणारा प्रतिसाद यामुळे काही भाग रडारवर आले आहेत. नोव्हेंबर महिन्यात होणारे हल्ले हे एखाद्या मोड्यूलची भूमिका आहे काय असा विचार केला जात होता. त्या भावनेतूनच सध्या युद्ध स्तरावर तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीरच्ा पुलवामामध्ये सुरू असलेल्या हालचालींचे काही मुंबई कनेक्शन तर नाही ना, याचा शोध घेतला जात आहे.