राज्यात बालमृत्यू दरात घट file photo
मुंबई

Infant Mortality Rate | राज्यात बालमृत्यू दरात घट

नवजात मृत्युदर हजारांमागे ११; देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आदिती कदम : Infant Mortality Rate | राज्यात नवजात अर्भकांच्या मृत्यूच्या दरामध्ये घट झाली असून, ही संख्या प्रतिहजार अर्भकांमागे ११ इतकी नोंदवली गेली आहे. राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने घटत आहे. केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार, २०१८ मध्ये राज्याचा बालमृत्यूचा दर प्रति एक हजार बालकांमागे १३ होता. तर पाच वर्षांखालील बालमृत्यूचा दर एक हजार बालकांमागे २२ वरून १८ झाला आहे.

महाराष्ट्र सर्वात कमी बालमृत्यूच्या बाबतीत देशात चौथ्या क्रमांकावर आहे. २०२० च्या अहवालानुसार सर्वांत कमी बालमृत्यू दराच्या बाबतीत केरळ आघाडीवर आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण प्रतिहजार जन्मांमागे ६ आहे; तर दिल्ली दुसऱ्या आणि तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत बालमृत्यूचा दर १२ आणि तमिळनाडूमध्ये हाच दर १३ इतका आहे. बालमृत्यू कमी करण्याच्या दिशेने राज्य सरकार गेल्या दशकभरापासून विविध उपाययोजना आखत आहे. काही वर्षांच्या नमुना नोंदणी सर्वेक्षणाच्या अहवालानुसार राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. दरम्यान, राज्याने २०३० पर्यंत बालमृत्यू दर १२ पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण सध्या राज्याचा बालमृत्यूदर ११ असल्याने हे उद्दिष्ट आधीच साध्य केले आहे.

केंद्राच्या अहवालानुसार, देशातील सरासरी बालमृत्यू दराच्या तुलनेत राज्यातील मृत्युदर कमी आहे. देशात नवजात मृत्युदर २० आहे, तर महाराष्ट्राचा दर ११ आहे. तसेच, देशात ५ वर्षांखालील बालकांचा मृत्युदर ३२ आहे; तर महाराष्ट्रात १८ आहे. एवढेच नाही तर देशात बालमृत्यूचे प्रमाण २८ आहे, तर महाराष्ट्रात १६ आहे. नवजात बालकांची काळजी, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात बालकांची काळजी, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, नेमियामुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व मिशन आणि नवसंजीवनी या योजनांमुळे मृत्युदर कमी होत आहे.

नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ५३ विशेष नवजात शिशू काळजी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामार्फत दरवर्षी अंदाजे ५० हजार ते ६० हजार आजारी नवजात शिशू तसेच कमी वजनाच्या बालकांवर उपचार केले जातात. याव्यतिरिक्त आदिवासी दुर्गम कार्यक्षेत्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २८१ भरारी पथकांद्वारे अतिजोखमीच्या माता व बालके यांचे निदान करून उपचार करण्यात येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT