मविआत २४० जागांवर मतैक्य file photo
मुंबई

MVA seat-sharing : महाविकास आघाडीत २४० जागांवर मतैक्य

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधानसभेच्या २८८ जागांपैकी २४० जागांवर महाविकास आघाडीचा (MVA seat-sharing) निर्णय झाला असून उर्वरित ४८ जागांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आघाडीच्या सूत्रांनी मंगळवारी स्पष्ट केले. ११ ऑक्टोबरला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्नीथला यांची जागावाटपाबाबत संयुक्त पत्रकार परिषद होईल, असे सांगितले जात आहे. दसऱ्यापर्यंत मित्रपक्षांसह सर्वांची एकत्र पत्रकार परिषद होईल, असे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीनंतर सांगितले. त्याचवेळी आघाडीच्या जागावाटपांचा निर्णय दिल्लीतील नव्हे, तर राज्यातील नेते घेतील, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आघाडीच्या बैठकीनंतर सांगितले.

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी जिंकलेल्या १५४ जागा काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाकडे राहतील. यात निफाड, रामटेक आदी जागांबाबत दावे-प्रतिदावे आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. अन्य ८६ जागांबाबत २०२४ लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते, २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर असलेले पक्ष आणि निवडून येण्याची क्षमता आदी निकष लावून या जागांचे वाटप झाले आहे. केवळ ४८ जागांवर वाद असून आणखी चार दिवस त्यावर चर्चा होईल. त्यातही या जागांवर तोडगा निघाला नाही, तर मविआतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून यावर निर्णय घेणार आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गट हे १०० पेक्षा जास्त जागा हव्यात, यावर अडून आहेत. मात्र ४८ जागांवर निर्णय झाल्यावर कोण किती जागा लढविणार याचे चित्र स्पष्ट होईल.

आज विदर्भातील जागांवर चर्चा

बहुतेक जागांवर निर्णय झाले आहेत. बुधवारी विदर्भातील काही जागांवर चर्चा होणार आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले. विदर्भात १० ते १५ जागांवर दावे प्रतिदावे आहेत. त्यावर चर्चा होईल. जे जिंकून शकतात, त्या पक्षाला जागा देणार असा निकष आहे. भाजपचे अनेक तालेवार नेते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT