Abhijat Marathi Bhasha Utkrashta Kendra Pune
पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यानंतर अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल मराठी) स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू होता.
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली असून, पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम राज्य सरकारने आधीच हाती घेतले होते. तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आम्हा सर्व नागरिकांना अत्यानंद होतो आहे, असेही फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणे ही महाराष्ट्र, देश आणि जगभरातील मराठीजनांसाठी बातमी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.