मुंबई; वृत्तसंस्था : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिवंत आहे का, पाकिस्तानमध्ये कुठे व कसा राहतो, त्याची सुरक्षा कोण सांभाळते, ‘आयएसआय’सोबत त्याचे कसे संबंध आहेत, या सगळ्या बाबींचा धक्कादायक आणि आजवरचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (एफबीआय) या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेसाठी दाऊदच्या नेटवर्कमध्ये घुसून काम केलेला मूळचा पाकिस्तानी अमेरिकन नागरिक कामरान फरिदी याने ही माहिती समोर आणली आहे.
कामरानच्या या खुलाशांमुळे भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम आमच्या देशात नाही, हा पाकिस्तानच्या खोटारडेपणा उघड झाला आहे. कामरानने ‘एफबीआय’साठी पाकिस्तानात दाऊद, ‘अल-कायदा’ व ‘इसिस’ (आयएसआयएस) च्या नेटवर्कमध्ये शिरून अनेक वर्षे काम केले होते.
‘आज तक रेडिओ’च्या पॉडकास्टमध्ये कामरान फरिदीने सांगितले, दाऊद स्वतःला धार्मिक म्हणतो. पाचवेळा नमाज पठण करणारा, मजलिस-मिलाद ऐकणारा असल्याचे सांगतो; पण तसे नाही. तो मोठा हाजी, पाचवेळा नमाज पढणारा किंवा परहेजगार (संयमी) नाही. खऱ्या आयुष्यात त्याला मैफली आणि मुजऱ्याचा शौक आहे. तो कोकेन घेतो, दारू पितो. मी स्वतः त्याला दारू विकत घेऊन दिली. त्याची प्रकृती ठीक नाही; पण अजूनही तो कोकेन घेतो. दाऊदच्या पार्ट्यांत मी उपस्थित असायचो. मी त्याला जवळून पाहिले आहे, असा दावाही कामरानने केला. ‘एफबीआय’ने कामरानला पाकमध्ये दाऊदच्या नेटवर्कमध्ये शिरण्यासाठी पाठवले होते, तेव्हा त्याची दाऊद इब्राहिमशी अनेकदा भेट व्हायची आणि दाऊदसोबत तो अनेक पार्ट्यांमध्ये जात असे.
दाऊद अजूनही सक्रिय; फक्त रात्री बाहेर पडतो
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अजूनही पूर्णपणे सक्रिय आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात तो आपली ठिकाणे बदलतो आणि बहुतेकवेळा रात्रीच बाहेर पडतो. त्याची सुरक्षा छोटा शकील सांभाळतो. शकील दर शुक्रवारी ‘आयएसआय’ मुख्यालयात जाऊन सुरक्षेशी संबंधित रिपोर्ट देतो, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेसाठी दाऊदच्या नेटवर्कमध्ये घुसून काम केलेला मूळचा पाकिस्तानी अमेरिकन नागरिक कामरान फरिदी याने केला आहे.
दाऊदचे अनेक भूमिगत अड्डे आहेत, जिथे मुजरे होतात. त्यातील एकाचे नाव ‘जमजमा’ आहे. ही कराचीतील एक गल्ली आहे. याचा कोड ‘२२ नंबर जमजमा’ असा आहे, हे सामान्य घर वाटते. त्याच्या खिडक्यांना काचा नाहीत; पण याच्या बेसमेंटमध्ये पूर्ण क्लबसारखे वातावरण आहे. ही जागा पूर्णपणे साऊंडप्रूफ आहे. बाहेर काहीच कळत नाही. इथे प्रचंड सुरक्षा असते. इथे दाऊद पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत बसून मुजरा पाहतो. इथे बिझनेस मिटिंगही होतात, असे कामरान फरिदी सांगतो.
‘इस्लाम बाबा’ची घ्यायचा परवानगी
कामरानने दाऊदच्या पाकिस्तानमधील तीन ठिकाणांची माहिती असल्याचाही दावा केला. एक रंजक खुलासा करताना कामरानने सांगितले की, दाऊद मुंबईतून ‘इस्लाम बाबा’ नामक फकिराला पाकिस्तानला घेऊन गेला होता. दाऊद आणि त्याची गँग मोठे काम करण्यापूर्वी ‘इस्लाम बाबा’ची परवानगी घेत. बाबांच्या मंजुरीनंतरच पुढचे पाऊल उचलले जात असे.
कामरानने सांगितले की, ‘एफबीआय’च्या एका ऑपरेशनअंतर्गत मी २०१८ मध्ये लंडनमध्ये दाऊदचा जवळचा सहकारी जाबिर मोतीवाला याच्या अटकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘एफबीआय’ला जाबिरला अमेरिकेत नेऊन दाऊद आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांच्यातील कथित आर्थिक संबंध सिद्ध करायचे होते; पण यासाठी कामरानची साक्ष महत्त्वाची होती. कामरान म्हणाला, कुटुंबाला दाऊद आणि ‘आयएसआय’कडून धोका असल्याच्या भीतीने मी अमेरिकन न्यायालयात साक्ष दिली नाही. यानंतर जाबिर पाकमध्ये परतण्यात यशस्वी झाला. मला या ऑपरेशनची मोठी किंमत मोजावी लागली. पाकिस्तानात परतल्यावर मला अटक करून अनेक महिने तुरुंगात ठेवले गेले. दाऊद व जाबिरने ‘आयएसआय’च्या मदतीने मला टार्गेट केले; पण केवळ अमेरिकेचे नागरिकत्व असल्यामुळेच मी वाचलो, असा दावाही कामरानने केला.