Dasara Political Rally
मुंबई : "दसरा सण मोठा ,नाही आनंदा तोटा ". दसरा म्हणजे देवीने आसुरांना मारले त्या विजयाचे पर्व. भारतभर दसरा साजरा होतो, रावणदहन, शस्त्रपूजन. महाराष्ट्रात तर गावोगावी दसर्याची वेगवेगळी संस्कृती. कोल्हापूर, सातारा येथे शाही दसरे , कोकणात मारुतीमंदिरात आपटयाची पाने देवाला वहायची अन् मग थोरांना वाटायची,आशीर्वाद घ्यायचे हा या मातीचा धर्म. पण आता दसरा हा जणू राजकीय सण झालाय का असे वाटायला लागावे अशी परिस्थिती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा ही शंभर वर्षांची परंपरा. त्यानंतर मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन झाल्यावर दसरा मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे यांनी मुलगा बाळासाहेब यांना महाराष्ट्रकारणासाठी जनतेला सोपवले. आता त्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले.
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळी, त्यातच एकनाथ शिंदे यांनी माझी शिवसेना खरी म्हणत दसरा मेळावा सुरु केला. हा झाला समांतर दसरा मेळावा.
पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा दरवर्षी पार पडतो. आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनीही दसरा मेळावा घ्यायला सुरूवात केली आहे. हे मेळावे आता राजकीय हेतुने सुरु झाल्याने सामान्य माणसाचा दसरा इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे अन् राजकीय मेळाव्यांचा सुकाळ सुरु झाला आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.