मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीत सावली नावाचा डान्सबार असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे विधानपरिषद सदस्य अनिल परब यांनी केला आहे.
अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. परब म्हणाले, या बारवर पोलिसांनी धाड टाकली असता 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचार्यांना पकडण्यात आले. यापैकी 4 ग्राहकांवर गुन्हा दाखल झाला असून या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला आहे. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे, असा सवाल परब यांनी यावेळी उपस्थित केला.
गृहमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्था विषय आहे. महिलांच्या प्रतिष्ठा राखण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. पण, त्याचवेळी मुंबईतल्या कांदिवलीमध्ये सावली हा डान्सबार सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांनी या प्रकरणात कारवाई केली नाही, तर सरकारचा याला पाठिंबा आहे, हे सिद्ध होईल.
परब यांनी आपल्या भाषणात राज्यपालही सुरक्षित नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, आम्ही आज राज्यपालांकडे गेलो असता आमच्या पीएला खाली उतरवण्यात आले. यामागे राज्यपालांच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगण्यात आले. यामुळे जर राज्यपाल सुरक्षित नसेल तर जनसुरक्षा विधेयक चाटायचे आहे का, असा संतप्त सवालही आमदार अनिल परब यांनी केला.
अनिल परब यांनी धादांत खोटे आरोप केलेले आहेत. पुरावे कसे खोटे आहेत हे देखील मी नक्कीच सिद्ध करून दाखवीन. योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन. बदनामी करण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये काही गोष्टी रेटून नेलेल्या आहेत. आज ते राजीनामाची मागणी करत आहेत. ही त्यांची कार्यपद्धती झालेली आहे. माझी बाजू लवकरच मांडेन, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.