संजय कदम
मुंबई : दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ म्हटले की कोणी पूर्ण पत्ता विचारत नाही. ठरलेल्या वेळी तो अगदी न चुकता पोहोचतो. असे सर्वपरिचीत आहे, दादरचे कोतवाल उद्यान. खरेतर त्याचे पूर्ण नाव 'बीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान' असे असले तरी कोतवाल उद्यान इतकाच त्याचा उल्लेख होतो.
याच कोतवाल उद्यानात गावचा विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली जाते. सकल्प सोडले जातात. ते पूर्ण केले जातात. या मैदानात कोणाच्या लग्नाची बोलणी झाली. शाळा मंदिरे उभारण्याचे निर्णय घेतले गेले. शनिवार आणि रविवारी तर सकाळ-संध्याकाळ गाववाल्यांच्या बैठकांनी उद्यान अक्षरशः गजबजलेली असते. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आजही सुरू आहे.
मुंबईच्यामध्यवर्ती भागातले हे ठिकाण. शहराच्या कोणत्याही कानाकोपर्यातून येण्यासाठी ते सोयीचे असल्याने केली अनेक वर्ष गावाकडच्या बैठका याच उद्यानात होतात. बैठक ऐन रंगात आली की किटली घेऊन 'चाय, चाय' करत चायवाला पोरगा येतो. चहा लागेल का असे त्याला विचारावे लागत नाही. तो स्वतःच विदाऊट शुगर किती आणि रेग्युलर किती विचारतो आणि तसे कप भरतो. सोबत कापडी पिशवीत छोटे बिस्किट पुढे असतातच. तिथलं बिल घेतलं, की पुढच्या बैठकीच्या ठिकाणी. त्याचा दिवसाचा धंदाही अगदी घसघशीत होतो.
बरं बैठकीला इथे बसण्याची व्यवस्था करावी लागत नाही. येतानाच प्रत्येकाच्या हातात एक पेपर दिसतो. गाडीतून येताना पूर्ण वाचून काढायचा. नंतर उद्यानात आले की, एखादी चांगली मोक्याची जागा बघायची आणि तिथे पेपर अंथरून ठेवायचे. आपले लोक बसतील अशा हिशोबाने जागा अडवायची. कोणी किती घट्टाकट्टा असला तरी बैठकीला तो मांडी घालूनच बसतो.
या ठिकाणी बैठकीसाठी येताना पूर्वी दादरला उतरून आयडियल आणि छबीलदासच्या समोरच्या गल्लीतून पुढे जिन्याने वर चढून यावे लागत असे. गर्दीतून वाट काढताना त्यावेळी अक्षरशः दमछाक होत असे. वयोवृद्ध लोकांचे तर खूपच हाल होत. पण आता तसे नाही. दादर स्टेशनवरून रेल्वेने थेट टिळक पुलापर्यंत ब्रिज बांधला आहे. त्यामुळे गर्दीचा प्रश्नच नाही. रेल्वेचा ब्रिज थेट कोतवाल उद्यानाजवळ येतो उद्यानात स्वच्छ आणि पुरेसे पाणी असलेले शौचालय आहे. त्यामुळे तोही प्रश्न मार्गी लागतो. फार तर पिण्यासाठी एखादी पाण्याची बॉटल सोबत ठेवावी लागते.
रविवारी सायंकाळी येथे बसलेल्या एका मंडळाच्या कार्यकत्यांमध्ये अगदी तावातावाने चर्चा सुरू होती. सहज म्हणून कानोसा घेतला. गावच्या नळपाणी योजनेवरून वाद सुरू असल्याचे लक्षात आले. नळपाणी योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याकरिता काहींनी आपल्या जमिनीत चरी मारायला विरोध केला होता तर काहींनी लोकवर्गणी भरण्यास नकार दर्शवला होता. बैठकीत सुरुवातीला थोडी तापातपी झालीच. पण शेवटी मार्ग निघाला. सामंजस्याने प्रश्न सोडवत नंतर गळ्यातगळे घालून कार्यकर्ते बाहेर पडले. चला, बाय... पुन्हा भेटू... असं म्हणत आपापल्या घराच्या दिशेने निघाले.
परेलचे शिरोडकर हायस्कुल, सोशिल सर्व्हिस लिग हायस्कुल, दादरचे छबीलदास या शाळांच्या वर्गामध्ये बैठक घ्यायची म्हटली तर तीन तासांसाठी किमान हजार रुपये मोजावे लागतात. इथे चहा घेऊन येणाऱ्यांचे दरही थोडे चढेच. कोतवाल उद्यानात एकदम फुकट. कितीही वेळ बसा. झाडांच्या सावलीत. झाडाच्या फांदीवर बसलेल्या एखाद्या कावळ्यापासून मात्र जरा सावध राहावे लागते, इतकाच काय तो त्रास.