मुंबई : दादरचा कबुतरखाना ताडपत्री टाकून बंद केल्याने कबुतरांचे दाणापाणीच तुटले असून, त्यांची संख्या आता कमालीची घटली आहे. ही कारवाई अशीच यशस्वी झाल्यास असंख्य मुंबईकरांना फुप्फुसाचे गंभीर आजार देत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी कबुतरे येथून कायमची हद्दपार होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कबुतरखान्यामधील कबुतरांना चार दिवसांपासून दाणे टाकणे बंद झाले आहे. अजूनही शेकडो कबुतरांचे थवे इथे सैरभैर होत येतात. दाण्यांसाठी ते कबुतरखान्यावरील ताडपत्री, दुकाने आणि इमारतींच्या छतावर बसतात. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जबर दंड बसण्याची भीती असल्याने कुणीही पुढे येऊन त्यांना दाणे किंवा पाणी देण्याची हिंमत करत नाही. आता कबुतरखान्यामधील कबुतरांना दाणे टाकणे बंद केल्याने दररोज 10 ते 15 कबुतरांचा दाण्याअभावी मृत्यू होत आहे. याविरोधात जैन समाजातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. मुंबई महापालिकेने दुसर्याच दिवशी दादरच्या सुप्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली.
कबुतरखान्यावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही जप्त केलेे. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही भूतदयावाद्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने सदर कारवाई योग्य असल्याचे सांगितले. न्यायालयानेही कबुतरखाना हटवण्याचे व दाणे टाकणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिकेला दिले. यानुसार पहिला गुन्हाही दाखल झाला आहे. पालिकेने शनिवारी कबुतरखाना बंदिस्त करून टाकण्याची कारवाई केली.
पालिकेने दादर कबुतरखान्यावर केलेली कारवाई योग्य आहे. ताडपत्री लावल्यावरही कबुतरे खाण्यासाठी त्याठिकाणी येतील. मात्र, धान्य मिळत नसल्याचे लक्षात येता, ते तिथे परत येणार नाहीत. लोकांनी धान्य टाकायचे बंद केले, तर हळूहळू या ठिकाणी येणार्या कबुतरांची संख्या कमी होईल. आणि एक दिवस असा येईल की, या ठिकाणी एकही कबूतर दिसणार नाही.जय श्रृंगारपुरे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना, अध्यक्ष
दादर कबुतरखाना 90 वर्षांपासून आहे. परंतु आता तो बंद करून काय होणार? या कबुतरांना फक्त जैन समाजातील लोक दाणे टाकत नव्हते, तर इतर जाती- धर्माचे लोकही दाणे टाकत होते. मात्र ते बंद केल्याने आता दररोज 20 ते 25 कबुतरे मरत आहेत. दारू, गुटखा सेवन करणे प्रतिबंध असतानाही नागरिक खातात, मग ते का बंद करत नाहीत?नरेंद्र शाह, स्थानिक रहिवासी, दादर
मी 10 ते 15 वर्षांपासून दुकानात काम करतो. मला श्वास घेण्यास त्रास होतो. कबुतरांची पिसे दुकानात येतात. तसेच विष्ठेची दुर्गंधी येते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. चार ते पाच दिवसांपासून पिसे खूप आतमध्ये येत होती. पालिकेने केलेल्या कारवाईमुळे आता ती येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.अनंत गांगण, दुकानदार