मुंबई : मुंबई महापालिकेने ताडपत्रीच्या शेडने बंद केलेल्या दादर येथील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाजाने बुधवारी आक्रमक भूमिका घेत कबुतरखान्याच्या शेडवर हल्लाबोल केला. शेडची तोडफोड केली. शेडवरील ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न करताना अटकाव करणार्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे दादरमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दादर कबुतरखान्यासमोर जैन मंदिर आहे. सकाळी दादरमधील जैन मंदिरात झालेल्या प्रार्थनेनंतर अचानक एक मोठा जमाव रस्त्यावर आला. पुरुष-महिलांचा समावेश असलेल्या या जमावाने थेट कबुतरखान्याच्या दिशेने कूच केली. यावेळी पोलिसांनी जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना धक्काबुक्की करत या जमावाने थेट कबुतरखान्याच्या दिशेने धाव घेतली. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आलेला कबुतरखाना खुला करण्याचा प्रयत्न केला.
या जमावातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. अटकाव करणार्या पोलिसांशी त्या जोरजोरात हुज्जत घालत होत्या. शेड उभारण्यासाठी वापरलेले सुंभ कापण्यासाठी अनेक महिलांच्या हातात सुर्या होत्या. रस्त्यावर येत आंदोलकांनी घोषणाबाजी करत रस्त्यावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सकाळच्या वेळी कामावर जाणार्या लोकांचेे हाल झाले. पोलिसांकडून आक्रमक जमावाला शांत करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. पोलिसांनी नंतर जमावाला एका बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेतले नव्हते किंवा गुन्हाही नोंदवला नव्हता. शिवाजीपार्क पोलिसांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कबुतरांचा विषय ऐकताच कोणतीही प्रतिक्रिया न देताच फोन कट करण्यात आला.
आंदोलन बाहेरच्या लोकांनी केल्याचा संशय
कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे झाले. आंदोलन बाहेरच्या लोकांनी केल्याचा संशय आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. जैन समाज आणि साधूसंत त्यांच्यासोबत नाहीत. बाहेरचे लोक कोण होते माहिती नाही. मात्र ट्रस्टच्या लोकांचा सहभाग नव्हता, असेही लोढा यांनी सांगितले. आज कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे झाले. कायदा हातात घेऊ नका. मुंबईकरांनी शांतता राखावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पर्यायी उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती देखील लोढा यांनी दिली.
किशोरी पेडणेकरांचा सरकारवर निशाणा
या घटनेबाबत सरकार बॅकफूटवर का जात आहे? प्रत्येक गोष्टीत बॅकफूटवर जाऊन निर्णय घेत आहेत. मुळामध्ये कबुतराच्या विष्ठेमुळे दमा होतो किंवा आजार होतात हे नक्की बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा अपमान होणार नाही, अशा पद्धतीने पहिल्यांदा पर्यायी जागा देऊन त्यांना इतरत्र हलवणे गरजेचे आहे, असे सांगत मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, जवळपास 93 वर्षांचा कबुतरखाना आहे, काल परवाच्या झोपडपट्टीला जर आपण संरक्षण देतो, तर यालाही संरक्षण दिले पाहिजे. फक्त मनुष्यवस्तीपासून त्याला लांब नेता येईल का? त्यांचा दाणापाणी थांबून चालणार नाही, ज्या क्रूर पद्धतीने सर्व काही झाले, त्याबाबतीत जैन समाज अगदीच हळवा झाला आहे. समाजा-समाजामध्ये अशा तेढ निर्माण होतील. त्याबाबतीत पर्यायी व्यवस्था द्या. त्यांचा जीव वाचवा. त्यांनाही पर्यायी व्यवस्था देऊन दाणापाणी द्या आणि मनुष्यवस्ती पासून लांब घेऊन जा, असा सल्ला देतानाच तुम्हाला कोणी अडवले आहे का, असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.
लोढा व अदानींच्या इमारतीमध्ये आदर्श कबुतरखाना उभारा : हर्षवर्धन सपकाळ
मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील 33 टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबुतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
कबुतरांमुळे फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून न्यायालयाने ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे कबुतरखाने हटवू नका अशी मागणी जैन समाजातून होत आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पण सरकार जाणीवपूर्वक अशा वादाला खतपाणी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला. दादरच्या कबुतरखाना येथे झालेल्या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे सांगितले जात आहे, पण हा सुद्धा बनाव आहे. राज्यात कोठेही काहीही घटना घडली की बाहेरच्या लोकांनी ती घडवून आणली हे ठोकळेबाज उत्तर देऊन सरकार आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते, असेही सपकाळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.