मुंबई: दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका वयोवृद्धासह व्यावसायिकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना दादर परिसरात उघडकीस आली आहे. हत्या झालेल्यांत अंकुश मनोहर आंबोकर आणि नरेश ऊर्फ नरोत्तम बाला वाघेला यांचा समावेश आहे. याप्रकरणी माटुंगा आणि दादर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. पहिल्या गुन्ह्यातील आठ जणांना दादर पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या गुन्ह्यातील दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पहिली घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता दादर येथील डॉ. येलमार हॉस्पिटलसमोर घडली. बँजोचा व्यावसाय असलेल्या अंकुश आंबोकरचा गौरव नथू सनस याच्याशी व्यावसायिक वाद होता. रविवारी रात्री अंकुश हा दादर येथे आला होता.
यावेळी तिथे गौरवसह दहा जणांनी त्याच्याशी जुन्या वादातून भांडण सुरू केले होते. यावेळी अंकुशला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीररीत्या जखमी होऊन बेशुद्ध झाला होता. केईएम रुग्णालयात त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी दहाही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोघांचा शोध सुरू आहे.
पार्किंग वादातून मारहाण
दरम्यान, दुसरी घटना दादर टी टी सर्कल, ब्रिजखाली घडली. नरेश वाघेला (वय 63)हा पत्नी सविता शंकर शिंदेसोबत राहतो. नरेश हा मनपाच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीवर काम करतो. रविवारी त्याच्या घरासमोरच एका व्यक्तीने कार पार्क केली होती.
त्यावरून झालेल्या वादावादीत त्या कारचालकासह अन्य एका व्यक्तीने नरेशला बेदम मारहाण केली होती. त्याने आधीच मद्यप्राशन केले होते, त्यात त्याला बेदम मारहाण झाल्याने तो बेशुद्ध झाला. केईएममध्ये दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.