मुंबई : राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच शाळांना मिळालेला सामाजिक उत्तरदायित्त्व निधी (सीएसआर) वापरावा, असे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
राज्यातील मोठमोठे उद्योग उत्तरदायित्व म्हणून सीएसआर निधी शाळांना उपलब्ध करून देतात. मात्र या निधीच्या विनियोगात सुसूत्रता यावी, या उद्देशाने विविध उद्योगांच्या सीएसआर प्रमुखांशी दादा भुसे यांनी नुकतीच चर्चा केली. राज्य सरकार विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणि उपक्रम राबवत आहे. पण विद्यार्थ्यांच्या आणि शाळांच्या गरजा लक्षात घेत विद्यांजली पोर्टलवर अधिक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे, असे यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले.
या पोर्टलवरून उद्योगांनाही शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गरजा समजू शकलीत. उद्योगांनी या गरजा लक्षात घेत देशाचे आदर्श नागरिक घडवण्याच्या या कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. विशेष म्हणजे शालेय शिक्षण विभागाने या वेळी राज्यातील शिक्षणाची सद्यस्थिती, सीएसआरमधून सुरू असलेले उपक्रम, सहकार्याची आवश्यकता असलेले उपक्रम, आदींची माहिती दिली.