नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Karwa Chauth ad : सणासुदीचा हंगाम आला आहे. या दरम्यान लहान-मोठ्या ब्रँड्सनी आपल्या उत्पादनांच्या जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच 'डाबर' कंपनीने केलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर डाबर कंपनीच्या 'त्या' बहुचर्चित जाहिरातीला ट्रोल केले जात आहे. 'करवा चौथ'च्या आधी ही विशेष जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीवरुन नेटकऱ्यांनी मात्र प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. सगळ्याच प्रतिक्रिया या जाहिरातीच्या विरोधातल्या नसून काही या जाहिरातीचं समर्थनही करत आहेत.
डाबर कंपनीच्या या ब्लीच उत्पादनाची जाहिरात गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होत आहे. या जाहिरातीवरून सोशल मीडियावर युझर्सकडून जोरदार चर्चा झडत आहे. डाबरच्या फेम या ब्लीच उत्पादनाच्या जाहिरातीत समलिंगी जोडपे 'करवा चौथ'चा सण साजरा करताना दिसत आहे. या जाहिरातीत एक महिला दुसऱ्या महिलेला क्रीम लावताना दिसत आहे. तेव्हा ती म्हणते, "ये गया गया तेरा फेम क्रीम गोल्ड ब्लीच." यावर दुसरी स्त्री उत्तर देते, "धन्यवाद! तु सर्वोत्तम आहेस." यानंतर ती विचारते की तुम्ही करवा चौथचे इतके 'कष्ट उपवास' का ठेवता? त्याला ती स्त्री उत्तर देते की त्याच्या आनंदासाठी. जेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला जातो, तेव्हा दुसरी स्त्री उत्तर देते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी. यानंतर दुसरी महिला येते आणि म्हणते की या दोघांचा हा पहिला करवा चौथ आहे. तसेच ती दोघांनाही साड्या देते. ती म्हणते, "दोघे चंद्राचा तुकडा घेतील." मग रात्री दोन स्त्रिया चाळणीच्या बाजूने चंद्राकडे आणि नंतर एकमेकांकडे पाहताना दाखवल्या जातात.
या व्हिडिओ क्लिपमध्ये डाबर कंपनीच्या फेम या ब्लीचची जाहिरात करण्यात आली आहे. या कंपनीच्या लोगोमध्ये एलजीबीटीक्यू चळवळीचं प्रतीक असलेल्या इंद्रधनुष्यातल्या रंगांचं प्रदर्शन करण्यात आलं आहे. त्यासोबत Glow with pride असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.
ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. एक युझर म्हणतो की, आपण जसे सण साजरे करत आलो आहोत तसे राहू देऊ नये का? हिंदू सणांमध्ये नेहमीच छेडछाड का केली जाते, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने विचारले की असे प्रयोग नेहमी हिंदू सणांसाठीच का केले जातात?
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी डाबरच्या या जाहिरातीवर टीका केली. तसेच कारवाईची धमकी दिली. या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूंच्या सणांना लक्ष्य केल्याची जोरदार टीका सोशल मीडियावर झाली. हा वाद लक्षात घेवून डाबरने जाहिरात मागे घेत माफी मागितली आहे. डाबरने एक ट्विट केले आहे. यात म्हटलंय की, आम्ही आमच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून 'करवा चौथ'ची जाहिरात मागे घेत आहोत. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतो.
दरम्यान, डाबरच्या या जाहिरातीआधी 'फॅबिंडिया' या कंपनीची 'जश्न-ए-रिवाज' ही जाहिरात वादाच्या भोव-यात सापडली होती. कपड्यांच्या संग्रहाच्या जाहिरातीमध्ये 'फॅबिंडिया' कंपनीने दिवाळीला जश्न-ए-रवाज असे म्हटले होते. अनेक युझर्सनी या जाहिरातीला दिवाळी सणाची खिल्ली उडवली गेल्याची टीका केली होती. दिवाळी सणाचे उर्दूकरण करण्याचा प्रयत्न का म्हणून केला असा सवालही अनेकांनी केला. सोशल मीडियावर सातत्याने विरोध झाल्यानंतर कंपनीने जश्न-ए-रवाज ही जाहिरात काढून टाकली.