Cyber Fraud Case (Pudhari File Photo)
मुंबई

Cyber Crime : सायबर ठगाकडून अबू सालेमच्या नावाचा वापर

कारवाई करण्याची भीती दाखवून वयोवृद्धाला घातला 71 लाखांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्थानिक पोलिसांसह सीबीआय, ईडीच्या नावाने डिजीटल अरेस्टची धमकी देऊन फसवणुकीचे प्रकार सुरू असतानाच आता फसवणुकीसाठी सायबर ठगाकडून अबू सालेमच्या नावाचा वापर झाल्याचे एका घटनेवरुन उघड झाले आहे. अबू सालेमसह दहशतावादी संघटनेला मदत केल्याचा आरोप करून या ठगाने एका वयोवृद्धाला सुमारे 71 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार मुलुंड परिसरात घडला. याप्रकरणी चार अज्ञातांंविरुद्ध पूर्व सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

यातील तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत मुलुंड परिसरात राहतात. अलिबागच्या एका आरोग्य विभागातून लॅब टेक्निशियन म्हणून ते निवृत्त झाले आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांना पोलीस उपनिरीक्षक संदीपराव असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने कॉल करून तो नाशिक पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध लोकांना धमकावून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यांचे एका खासगी बँकेत खाते असून याच खात्यात अबू सालेमने त्याला मिळालेल्या रक्कमेतून दहा टक्के कमिशनची रक्कम ट्रान्स्फर केली आहे. त्यांचे भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनेशी संबंध असून ते संबंधित संघटनेला मदत करतात असे विविध आरोप केले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना त्याचे ओळखपत्र पाठवले, व्हिडीओ कॉल करून तो पोलीस असल्याचे भासवले होते.

या गुन्ह्यात दहाजणांना आरोपी करण्यात आले असून त्यात त्यांचा सहभाग आहे. या दहाजणांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने अटकेची नोटीस काढल्याचे पत्रही पाठवले होते. त्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची बतावणी करून त्यांना विविध बँक खात्यांत पैसे पाठवण्यास प्रवृत्त केले. कारवाईसह अटकेच्या भीतीने त्यांनी 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर या कालावधीत विविध बँक खात्यांत सुमारे 71 लाख रुपये ट्रान्स्फर केले. चौकशीनंतर ही रक्कम त्यांच्या खात्यात पुन्हा ट्रान्स्फर होईल, असेही सांगितले होते. मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. विचारणा केल्यानंतर त्यांना संबंधित व्यक्तीकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.

ऑनलाईन फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चार अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पूर्व सायबर सेल पोलिसांनी तोतयागिरी करून पैशांचा अपहार करून फसवणूक करणे या भारतीय न्याय संहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

सायबर ठगांची चलाखी

ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत स्थानिक पोलिसांसह ईडी, सीबीआयच्या नावाने अनेकांना विशेषत: वयोवृद्धांची फसवणूक झाली आहे, मात्र आता आबू सालेम आणि दशहतवादी संघटनेच्या नावाने डिजीटल अरेस्टची भीती दाखवून सायबर ठगांकडून फसवणूक होत असल्याने खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT