Cyber Fraud Pudhari
मुंबई

Mumbai Cyber Fraud: सायबर ठगांचे टार्गेट आता मुंबईतील महानगर गॅसचे ग्राहक; पुरवठा बंदची धमकी देत 14 लाखांची फसवणूक

एपीके फाईल आली तर उघडू नका!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई / कुर्ला: सायबर ठगांनी अलीकडे मुंबईतील महानगरच्या गॅस ग्राहकांना लक्ष्य केले आहे. बिल थकवल्याचे सांगून महानगर गॅस लिमिटेडचा कर्मचारी असल्याची बतावणी करून मुंबईतील दोन ग्राहकांची सुमारे 14 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात चेंबूरमधील एका नामांकित डॉक्टर व बोरिवलीतील एका व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे.

53 वर्षांचे तक्रारदार बोरिवलीतील सिद्धार्थनगरात राहात असून ते व्यावसायिक आहेत. शनिवारी दुपारी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्‌‍सॲप कॉल आला. महानगर गॅसमधून बोलत असल्याचे सांगून तुमचे बिल पेंडिंग असल्याची बतावणी करीत ठगाने त्यांच्या बँक खात्यातून सुमारे साडेचार लाख काढून घेतले.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू आहे.

चेंबूरमधील नामांकित डॉक्टर नीलकमल ठंडन (72 ) यांचीही अशीच फसवणूक झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे बिल बाकी असल्याचे सांगितले. मात्र तक्रारदाराने माझी सर्व बिले भरलेली आहेत असे सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांना बिल अपडेट करण्यासाठी लिंक पाठवली.

लिंक उघडून त्यामध्ये त्यांची काही माहिती भरली. यावेळी आलेला ओटीपीदेखील आरोपीला देण्यात आला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यामधून एकूण नऊ लाख 49 हजार रुपये काढून घेतले. तसे मेसेज डॉक्टर यांच्या मोबाईलवर येताच त्यांनी तत्काळ ही बाब त्यांच्या मुलीला सांगितली. मुलीने याबाबत सायबर पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करत फसवणुकीची माहिती दिली.

अशी केली दोघांची फसवणूक

ॲपमध्ये बिल रिफ्लेक्ट होत नसल्याचे सांगून त्याने त्यांना एमजीएल नावाची एपीके फाईल पाठविली. ती फाईल ओपन करुन त्यांनी त्यांच्या माहितीसह बँक खात्याचे डिटेल्स भरताना किरकोळ पेमेंट करण्यास सांगितले. ते पेमेंट फेल होते. त्यानंतर ग्राहक पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. मात्र पेमेंट होत नाही. मात्र सायबर ठग तोपर्यंत त्यांचे बँक अकाउंट रिकामे करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT