Senior Citizen 
मुंबई

Senior Citizen Cyber Fraud-ज्येष्ठ नागरिकाला फसवणाऱ्याला अटक सायबर टोळ्यांचा आणखी एक प्रकार उघडकीस

ज्येष्ठ नागरिकाला फसवणाऱ्याला अटक सायबर टोळ्यांचा आणखी एक प्रकार उघडकीस; आर्थिक व्यवहारांची साखळी तपासणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर टोळ्यांचा आणखी एक प्रकार मुंबईत उघडकीस आला. दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी ७५ वर्षीय व्यक्तीची ३१.५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून, आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःची ओळख केंद्रीय तपास यंत्रणा आणि पोलीस अधिकारी अशी करून दिली. पीडिताच्या नावावर गंभीर आर्थिक गुन्हा नोंद झाल्याचा बनाव रचत त्यांना 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अटक टाळायची असेल तर पैसे सुरक्षित खात्यात जमा करण्यास सांगून ३१.५ लाख उकळण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने दक्षिण विभाग सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तांत्रिक तपास, बँक व्यवहार आणि मोबाईल डेटाच्या आधारे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यात छापा टाकून एका संशयिताला अटक केली. त्याची कसून चौकशी सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

तपासात फसवणुकीची रक्कम विविध म्युल बँक खात्यांमधून फिरविण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे खातेदार, आर्थिक एजंट व इतर संबंधितांची भूमिकाही तपासली जात आहे. सायबर पोलिसांच्या मते, 'डिजिटल अरेस्ट'च्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये संघटित टोळ्या बनावट ओळख अशा अनेक स्तरांवरील आर्थिक व्यवहारांचा वापर करतात.

भारतात 'डिजिटल अरेस्ट' अशी कोणतीही कायदेशीर संकल्पना नाही. कोणताही पोलीस, सीबीआय, ईडी किंवा अन्य सरकारी अधिकारी फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे भरण्याचे आदेश देत नाही. अशा प्रकारचे कॉल आल्यास त्वरित कॉल बंद करून १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT