मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सफारीमधील 'मानसी' नामक मादी सिंहाने गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी रात्री गोंडस छाव्याला जन्म दिला. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील प्राणिसंग्रहालयात जवळपास १४ वर्षांनी सिंहाचा जन्म झाला आहे. (Sanjay Gandhi National Park)
राष्ट्रीय उद्यानातील सिंह आणि व्याघ्र सफारी हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. यातील सिंह सफारीमध्ये गुरुवारी रात्री छाव्याचा जन्म झाला. डिसेंबर, २०२२ साली गुजरातमधून 'मानस' आणि 'मानसी' या सिंहाच्या जोडीला राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. उद्यानात दाखल झाल्यावर या जोडीमध्ये तणाव होता. कारण, नर 'मानस' हा रागीष्ट असल्याने तो मादीला स्वीकारत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये मिलन होत नव्हते. काही वेळा त्याने मादीला जखमी केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या.
दरम्यानच्या काळात मादी 'मानसी' ही आजारी पडली. १८ दिवस तिने काही खाल्ले नाही. मात्र, उद्यानाच्या पशुवैद्यकाच्या टीमने 'रेस्क्यू-पुणे'च्या मदतीने 'मानसी'वर उपचार करुन तिला जीवदान दिले. त्यानंतर उद्यानाचे संचालक जी.मल्लिकार्जुन, विभागीय वन अधिकारी रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनअंतर्गत पशुवैद्यक डॉ. विनया जंगले आणि त्यांच्या टीमने 'मानस' आणि 'मानसी' यांच्या मिलनसाठी प्रयत्न सुरू केले. सप्टेंबर, २०२३ साली त्याला यश मिळाले. ३० सप्टेंबर रोजी या जोडीचे शेवटचे मिलन पार पडले. त्यानंतर प्रतीक्षा सुरू झाली.
ऑक्टोबर महिन्यापासून 'मानसी' गरोदर असल्याची लक्षणे पशुवैद्यकीय चमूला आढळून आली. नोव्हेंबर, २०२३ साली तपासणी केल्यानंतर ती गरोदर असण्यावर शिक्कामोर्तब झाले. मिलनानंतर जवळपास १०८ दिवसांनी गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता 'मानसी'ने गोंडस छाव्याला जन्म दिला. महत्त्वाचे म्हणजे १६ जानेवारी रोजीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या दोघांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पिल्लू हे सुखरूप असून त्याचे वजन हे १ किलो ३०० ग्रॅम एवढे आहे.