मुंबई : येणार येणार म्हणताना अखेर भुयारी मेट्रो दक्षिण मुंबईत येऊन पोहोचली आहे. तब्बल ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कफ परेड मेट्रो स्थानकापर्यंत भुयारी मेट्रोची अंतिम चाचणी सुरू झाली आहे. ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ भुयारी मार्गिकेच्या वरळी ते कफ परेड या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण ३० सप्टेंबरला होणार होते. मात्र अद्याप सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने लोकार्पण पुढे ढकलण्यात आले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आरे ते बीकेसी
या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याचे लोकार्पण झाले. यामुळे मेट्रो दक्षिण मुंबईच्या दाराशी येऊन ठेपली. पण मुंबईचे शेवटचे टोक गाठण्यासाठी आणखी ४ महिने लागले. अखेर वरळीत खोळंबलेली भुयारी मेट्रो कफ परेडला प्रस्थान करण्याची वेळ आली आहे.
भुयारी मेट्रोमुळे दिलासा
सीएसएमटी, चर्चगेट या अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना भुयारी मेट्रोमुळे दिलासा मिळेल. काही मिनिटांच्या कालावधीत इच्छित स्थळी पोहोचता येईल. तसेच रेल्वेगाड्यांमध्ये होणाऱ्या तुडुंब गर्दीपासून सुटका होईल अशी आशा प्रवाशांना आहे.