मुंबई : शहरात वर्दळीच्या व रेल्वे स्थानकांबाहेरील रस्त्यांवर बेकायदा फेरीवाल्यांनी वर्षानुवर्षे आपली दुकाने मांडली होती. त्यामुळे मुंबईकरांना येथे चालणेही मुश्कील झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाने याची दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबई महापालिकेने शहरातील अशी २० गर्दीची ठिकाणे फेरीवालामुक्त केली आहेत.
फिरत्या पथकांद्वारे महापालिका येथील फेरीवाल्यांवर दररोज नजर ठेवत आहे. असे असले तरी अधूनमधून फेरीवाले येथे आपली दुकाने मांडत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई होत होती. मात्र, फेरीवाले पुन्हा आपली दुकाने मांडत होते. त्यामुळे ही समस्या सोडविण्यात पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी असमर्थ ठरले होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना खडे बोल सुनावले होते.
यादरम्यान, मुंबई महापालिकेने मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येवर उच्च न्यायालयात माहिती देताना, शहरातील २० जागांची यादी सादर करीत ही ठिकाणी फेरीवालामुक्त करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार महापालिकेने ही २० ठिकाणे फेरीवाला मुक्त केली असल्याचे सांगितले आहे.
सीएसएमटी स्टेशन ते न्यायालयापर्यंत
चर्चगेट ते उच्च न्यायालय
कुलाबा कॉजवे
दादर स्टेशन (पूर्व आणि पश्चिम)
दादर टी.टी.
लालबागचा राजा
अंधेरी (पूर्व, पश्चिम)
कांदिवली मथुरादास रोड
मालाड स्टेशन (प.)
बोरिवली (प.)
भारूचा रोड, दहिसर
कुर्ला (प.) स्टेशन
लिंकिंग रोड (प)
हिल रोड (वांद्रे प.)
घाटकोपर स्टेशन (पूर्व आणि पश्चिम)
एल.टी. मार्ग
मोहम्मद अली रोड
अंधेरी (पू.)
एल.बी.एस
निर्देशानुसार शहरातील २० ठिकाणांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाची पथके कार्यरत आहेत. याठिकाणी फेरीवाले दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येते. संध्याकाळच्या वेळी या सर्व ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन विभागाची गाडी आणि कामगार तैनात असतात. यामुळे फेरीवाले बसण्यास चाप बसला आहे.चंदा जाधव, उपायुक्त, विशेष