नवी मुंबई : नियोजीत शहर म्हणून लौकीक असलेल्या नवी मुंबईतील घणसोली सेक्टर 16 मधील स्मशानभूमीत विजेची पर्यायी व्यवस्था नसल्याने चारचाकी वाहनांच्या हेडलाईटसवर अंत्यविधी करावा लागला. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर नवी मुंबईतील स्मशानभूमींमधील पर्यायी वीज व्यवस्थेची माहिती घेतली असता शहरात 16 स्मशानभूमी असून एकाही ठिकाणी जनरेटरची व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी वीज खंडीत झाल्यास अंत्यसंस्कारावेळी नागरिकांची अशी गैरसोय होत आहे.
सहा हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या महापालिकेला स्मशानभूमीत जनरेटरचीही व्यवस्था करता येत नाही का असा सवाल नातेवाईकांनी केला आहे. तर मनसेच्या रस्ते आस्थापना विभागाच्या नवी मुंबई शहर संघटक संदीप गलुगडे यांनी नागरी सुविधांवर लक्ष द्यायला महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत स्मशानभूमीत जनरेटरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
स्मशानभूमीमतील लाईट गेली होती. पर्यायी व्यवस्थेची मागणी करण्यात आली, मात्र जनरेटरची व्यवस्था येथे नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी आपली चारचाकी वाहने समोर उभी करीत हेडलाईट सुरू केल्या. तसेच इतरांनी मोबाईलच्या टॉर्च सुरू केल्या. या प्रकाशावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. नवी मुंबईसारख्या शहरात ही गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
स्मशानभूमीसारख्या ठिकाणी विजेची पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे. हे ठिकाण दिवस-रात्र वापरले जाते. त्यामुळे प्रत्येक स्मशानभूमीत विद्युत जनरेटरची सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेने तत्काळ उपलब्ध करून द्यावी.संदीप गलुगडे, मनसे, शहर संघटक, नवी मुंबई