मुंबई : चित्रपटांमधील समान कल्पनांवर कॉपीराईटचा दावा करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. बालाजी टेलिफिल्म्सला ‘ड्रीम गर्ल 2’ नावाच्या चित्रपटाचा गैरफायदा घेण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेश द्या, अशी मागणी एका याचिकेतून केली होती. त्याची नोंद घेताना न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला आहे.
बालाजी टेलिफिल्म्सने ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाच्या माध्यमातून ‘कल किसने देखा’ या पटकथेचे उल्लंघन केले, असा आरोप करीत अशीम बागची यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संबंधित पटकथा ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणून पुन्हा नोंदणीकृत करण्यात आली होती, याकडे याचिकाकर्त्याने न्यायालयाचे लक्ष वेधले होते. तथापि, याचिकाकर्त्याचा हा दावा न्यायमूर्ती छागला यांनी अमान्य केला. प्रतिस्पर्धी कामे पूर्णपणे वेगळी आहेत. केवळ समान कल्पना असल्याच्या कारणावरून कुणी कॉपीराईटचा दावा करू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.