कूपरची रुग्णसुरक्षा बेभरोशाचीच pudhari photo
मुंबई

Cooper Hospital negligence : कूपरची रुग्णसुरक्षा बेभरोशाचीच

आणखी एक महिला खाटेवरून पडली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयात रुग्णांना कधी उंदीर चावत आहेत तर कधी रुग्ण खाटेवरून पडत आहेत. या घटना सुरूच आहेत. महिनाभरात तीन रुग्ण खाटांवरून पडले आहेत. चार दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे रुग्ण सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.

मात्र मिरगीचा झटका आल्याने ही महिला पडल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले. तर रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याची मागणी केली आहे. कूपर रुग्णालयातील 80 वर्षांच्या झिन्नत रसूल अहमद यांना 30 नोव्हेंबर रोजी उपचारासाठी दाखल केले होते. रात्री उशिरा त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईक महिला थंडी वाढल्याने पंखा बंद करण्यासाठी दोन पावले दूर गेल्या आणि इतक्यात झिन्नत या अचानक बेडवरून थेट जमिनीवर कोसळल्या.

रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, झिन्नत यांना उच्च रक्तदाब, फिट्स येणे आणि मनोविकार असे आजार असून त्या मिरगीच्या झटक्यामुळेच त्या पडल्या. हा अपघात असून रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीशी संबंधित आहे. तसेच या रुग्णाला रेलिंग बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाकडून सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात एक ज्येष्ठ महिला रुग्ण अशीच पडल्याची घटना घडली होती.

नातेवाईकांकडून रेलिंगची मागणी

वॉर्डमध्ये रात्री नातेवाईकांना वॉर्डमध्ये राहू दिले जात नाही. तसेच अनेक बेड ला सेफ्टी ग्रील नसतात. त्यामुळे किमान बेडवर सेफ्टी ग्रिल अनिवार्य करावी किंवा गंभीर रुग्णांसोबत एक नातेवाईक राहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

लवकरच निविदा

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या महिला वॉर्डमध्ये एकूण 10 बेडला रेलिंग आहे. आम्ही लवकरच अजून 20 रेलिंग बेडसाठी निविदा काढणार असून, याची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे एकूण 30 रेलिंग बेड्स आमच्याकडे उपलब्ध होतील. वॉर्डची क्षमता 80 आहे. त्यामुळे किमान 40 रेलिंग बेड असणे गरजेचे आहे. 30 बेड लवकर होतील, त्यानंतर आणखी 10 रेलिंग बेड्ससाठी देखील प्रयत्न करणार आहोत.

सुरक्षेसाठी अतिरिक्त रक्षकांची मागणी

मुंबई : कूपर रुग्णालयातील वाढत्या सुरक्षेच्या गरजेनुसार अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध होणार आहेत. मुंबई महापालिकेकडून आलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने अतिरिक्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास तत्त्वतः सहमती दिली आहे.

महामंडळाच्या ई-पोर्टलवर कोटेशन नोंदविणे, शुल्क तपशील अपलोड करणे आणि अधिकृत मागणी नोंदविणे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सुरक्षारक्षकांची प्रत्यक्ष नियुक्ती होणार आहे. तसेच, सुरक्षारक्षक नियुक्तीसाठी लागणारा निधी महापालिकेकडून उपलब्ध झाल्यावरच संबंधित रुग्णालयात रक्षक पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

महामंडळाच्या दरपत्रकानुसार शुल्क अंमलात असून, कोणत्याही अडचणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने माहिती द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रशासनिक मंजुरी मिळाल्यानंतरच कूपर रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT