Motilal Nagar redevelopment Pudhari
मुंबई

Motilal Nagar redevelopment: मोतीलालनगर पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप; प्रकल्पाचे मंजुरीपत्र रद्द करण्याची रहिवाशांची मागणी

मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प बांधकाम आणि विकास तत्त्वावर राबवला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मोतीलालनगर पुनर्विकासात अदानीकडून नेमण्यात आलेल्या कंपनीला पुनर्विकासाचा अनुभव नसून या प्रकल्पातील वास्तुविशारद वादग्रस्त आहे, असा आरोप रहिवासी करत आहेत. तसेच मोतीलालनगरमध्ये म्हाडाची सभा होण्यापूर्वीच मंजुरी पत्र देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये नाराजी असून ते पत्र रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प बांधकाम आणि विकास तत्त्वावर राबवला जात आहे. यावरून रहिवासी आणि म्हाडामध्ये मोठा वाद सुरू आहे. मात्र तरीही म्हाडाने निविदा काढून अदानीची विकासक म्हणून नियुक्ती केली.

प्रत्यक्षात हा प्रकल्प अदानीची इस्टेट व्हूय डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी राबवणार आहे. ही कंपनी 2023 मध्ये स्थापन झालेली नवीन कंपनी आहे. एवढ्या मोठ्या पुनर्विकास प्रकल्पासाठी अनुभवी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपनीची गरज असताना अत्यल्प भांडवल असलेल्या कंपनीला हे काम देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये शंका निर्माण झाली आहे.

म्हाडाने पूर्वी रहिवाशांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही, असे सांगितले होते. प्रत्यक्षात म्हाडाने 17 एप्रिलला गणेश मैदानात आराखडा सादर करण्याआधीच 25 मार्चला मंजुरी पत्र म्हणजेच आयओए दिले होते. प्रथम मोकळ्या जागेवर पुनर्विकास होईल असे म्हाडाकडून सांगण्यात आले होते.

त्यासाठी म्हाडाने सर्व मैदाने इस्टेट व्ह्यू डेव्हलपर्सच्या ताब्यात दिली आहेत. अण्णाभाऊ साठे मैदान येथे कुंपणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्रत्यक्षात या कुंपणासाठी कुठलीही अधिकृत मंजुरी घेण्यात आल्याचे म्हाडाच्या संकेतस्थळावर दिसून येत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या मैदानाच्या जागेवर व्यावसायिक इमारती दाखवण्यात आल्या आहेत. मंजुरी पत्रानुसार आंबेडकर मैदानासह भोवतीच्या चाळीही हटवण्याचा म्हाडाचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप मोतीलाल नगर विकास समितीने केला आहे.

त्यामुळे रहिवाशांना विश्वासात न घेता मनमानीपणे आणि गंभीर अनियमितता करत सुरु असलेली सर्व कामे तात्काळ थांबवावीत व मंजुरी पत्र रद्द करावे, अशी मागणी करणारे पत्र मोतीलाल नगर विकास समितीने म्हाडाला पाठवले आहे. या प्रकरणी विकासक आणि वास्तुविशारद यांना पत्र पाठवून म्हाडाने खुलासा मागवला आहे.

वास्तुविशारदाच्या पात्रतेबाबत शंका

या प्रकल्पामध्ये वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक (एल.एस.) म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते निखिल दीक्षित स्वतः नोंदणीकृत वास्तुविशारद नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. समितीच्या माहितीनुसार, याबाबत यापूर्वी काही संस्थांनी वास्तुविशारद परिषदेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर परिषदेने दीक्षित यांना नोटीस बजावून वास्तुविशारद हा शब्द वापरण्याबाबत आक्षेप घेतला होता. याबद्दल त्यांनी माफीही मागितली होती. असे असताना त्यांची वास्तुविशारद म्हणून नियुक्ती कशी करण्यात आली, असा प्रश्न मोतीलाल नगर विकास समितीने उपस्थित केला आहे.

असा आहे प्रकल्प....

गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सी ॲण्ड डी एजन्सी म्हणून अदानी समुहाची नियुक्ती केली आहे. या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला 3 लाख 97 हजार 100 चौरस मीटर क्षेत्रावर विकासकाकडून घरे बांधून मिळणार आहेत.

मोतीलाल नगर 1,2 व 3 मध्ये 3700 गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन साधारणपणे 5 लाख 84 हजार 100 चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे. 142 एकर जागेवरील मोतीलाल नगर प्रकल्पात रहिवाशांना 1600 चौरस फुटांच्या सदनिका देण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT