मुंबई

विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस-शिवसेनेत वाद

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना शिवसेना ठाकरे गटाने परस्पर चारही जागांवर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नाराज असून या प्रकरणी काँग्रेसशी संवाद साधण्याची तयारी उद्धव ठाकरे दाखवत नसल्याने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद चिघळला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्र न लढता स्वबळावर लढू शकते, असे संकेत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळातही सांगलीसारख्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केला. यामुळे काँग्रेस-शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदारसंघासाठीचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल, यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. भाजपसोबत 25 वर्षांची मैत्री तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करताना ठाकरेंनी तेव्हा भाजप नेत्यांचेही फोन उचलले नव्हते, असे सांगितले जाते. त्यामुळे आता काँग्रेसच्या प्रयत्नांना दाद न देऊन ठाकरे यांनी आपण आपले उमेदवार मागे घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

ठाकरेंनी फोन उचलला नाही : पटोले

एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी फोन उचलला नाही , अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांना मी फोन केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होते की विधान परिषदेच्या दोन जागा आम्ही लढतो आणि दोन जागा तुम्ही लढा. त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारले की तुमचे उमेदवार कोण आहेत? मी त्यांना आमच्या उमेदवारांची नावे सांगितली. यानंतर त्यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून घेतले आणि त्यांना शिवसेनेचे तिकीट जाहीर केले, अशा शब्दात पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सारा घटनाक्रम सांगितला.

विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने संदीप गुळवे यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. दिल्लीवरून हिरवा कंदील मिळणार होता. पण ठाकरे गटाने काँग्रेसचा हा उमेदवार पळविला, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या द़ृष्टिकोनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (12 जून) माजी नगरसेवक व शाखाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी बैठक बोलावली आहे. परब यांच्या संकल्पपत्राचे अनावरणही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे होणार आहे.

SCROLL FOR NEXT