मुंबई ः राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी, अशी दोन्ही बाजूची इच्छा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचवेळी इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशीही बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले. पुण्यात राजकीय गोंधळ असल्याने तिथे आघाडी सोडून काँग्रेस कुणाशीही युती करणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आदी सदस्य उपस्थित होते.
पुण्यावर बारीक नजर
पुण्यात सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. पुण्याच्या राजकीय परिस्थितीवर आमची बारीक नजर आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून प्रस्ताव आले, तर आम्ही दोन दिवसांत कुणाशी आघाडी करायची याबाबत निर्णय घेऊ, अशी स्पष्ट भूमिका सपकाळ यांनी जाहीर केली. स्थानिक नेत्यांना आघाडी करण्याचे अधिकार दिले असले तरी अंतिम निर्णय हा काँग्रेसची राज्य पार्लमेंटरी बोर्ड घेते. त्यामुळे पुणे,नाशिक याबाबत या बोर्डाने मनसे किंवा अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे ते म्हणाले.
पुण्यात आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना दिला होता. याबाबत विचारले असता, कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही. आम्ही अद्याप पुण्याबाबत दिशा ठरविलेली नाही, योग्यवेळी निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंशी बोलणी सुरू
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष या नात्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. संघटनेच्या नेत्यांना तशा सूचना दिल्या आहेत, याशिवाय कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल. मुंबई महापालिकेतील आघाडीच्या चर्चेचा मी भाग नाही, पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत, यासाठी तिघांकडे पक्षाने संवादाची जबाबदारी सोपवलेली आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
प्रशांत जगताप प्रवेशाची चर्चा नाही
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार यांच्यासोबत आघाडी नको, अशी बाणेदार भूमिका घेतली आहे. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. ते काँग्रेसमध्ये येण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.
तिकीटवाटपात सोशल इंजिनीअरिंग
जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या शिफारशी लक्षात घेऊन पक्षपातळीवर संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. सोशल इंजिनीअरिंग लक्षात घेऊन तिकीटवाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.