Mumbai Municipal Corporation elections : मुंबई काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची एकमताने मागणी केल्याची खात्रीलायक वृत्त आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी लढणार की स्वतंत्र, याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याचा आजच्या बैठकीत एकमत होणार असल्याचे समजते.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना ठाकरे गट हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे. ठाकरे बंधुंची युती झाली तरी महाविकास आघाडीत मनसेच्या सहभागाला काँग्रेसने विरोध केला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा झाला मात्र आपल्याला फायदा होत नसल्याचा काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांचा सूर आहे. अल्पसंख्यांक मतदार काँग्रेसकडून दूर जात असल्याबाबत सर्वच स्थानिक नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविण्याच्या तयारी सुरु केली आहे. राज्यात कोठेही कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, अशी माहिती काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांनी दिली. मुंबई कांग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांकडून एकला चलो रे साठी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. मनसेसोबत जुळवून घेण्यास देखील कांग्रेसचा नकार दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.