मृणालिनी नानिवडेकर
मुंबई:
एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गेले काही महिने घेतलेल्या मेहनतीला मिळणारा प्रतिसाद उत्तम असून, आता प्रत्येक विधानसभेत पोहोचा, असे निर्देश पक्षाचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी दिले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात तरुणांना समोर आणण्याच्या सपकाळ यांच्या धोरणामुळे नवतरुण पक्षाशी जोडले जात असल्याचे दिसते आहे, असे ते म्हणाले. तरुणाईबरोबरच जेन-झी तसेच अल्फा पिढीला या मोहिमेत बरोबर घेऊन सतर्क राहावे आणि संपर्क अभियान जोरात सुरू करावे, असे आदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत.
राज्यात अग्रेसर होण्याचे आदेश
येत्या काही दिवसांत काँग्रेसने राज्यात क्रमांक एकचा पक्ष होण्यासाठी धडपड सुरू करावी. जनतेला न्याय देणारे सरकार यावे यासाठी पक्षाने राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.
खासदारांची संख्या लक्षणीय
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या ‘हाता’वर निवडून आलेल्या खासदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे येथे व्यापक जनसंपर्क मोहीम राबवून पक्षाचे जुने दिवस विधानसभेतही परत आणावेत, असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या सर्व आघाडीप्रमुखांच्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता मोठे काम सुरू करा, असे सांगण्यात आले आहे. नवसृजन अभियानात संघटनेतील बहुतांश मंडळी आता पक्षाशी जोडली गेली आहेत. त्यांच्या माध्यमातून आता कामाला लागा, असे सांगण्यात आले आहे.
पक्षाच्या प्रत्येक आघाडीसाठी पुढच्या सहा महिन्यांचे धोरण आखून देण्यात आले आहे. सिरिवेल्ला प्रसाद यांचे महाराष्ट्रातले दौरे आता वाढणार आहेत. ते प्रत्येक जिल्ह्यात जातील, तसेच प्रत्येक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधतील.