पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज (दि. १४) दिल्लीत काँग्रेस हायकमांडसोबत बैठक झाली. या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली, मेरिटच्या आधारावरच सर्व उमेदवारांची निवड केली जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड हे दिल्लीतील बैठकीला हजर होते. खर्गे यांच्यासोबत निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. आम्ही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू. महाविकास आघाडी सर्व २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली, मेरिटच्या आधारावरच सर्व उमेदवारांची निवड केली जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.
राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर केली आहे, यावर नाना पटोले यांनी "हा निवडणूक जुमला आहे. गांभीर्याने घेऊ नका" अशी टीका केली आहे.