मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी सचिव आणि गेल्या १७ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते मनोज यादव यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गोरेगाव तालुका अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या यादव यांच्या राजीनाम्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रात मनोज यादव यांनी मुंबई काँग्रेसमध्ये घराणेशाही, भ्रष्टाचार आणि गटबाजी बोकाळल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड तसेच माजी मंत्री अस्लम शेख यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यादव यांनी पत्रात खळबळजनक आरोप करत म्हटले आहे की, एका माजी मंत्र्याच्या नातेवाईकाने उमेदवारी तिकीट मिळवून देण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक ५८ (गोरेगाव) येथून उमेदवारी मागितली असताना, २०१४ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या आणि २०१९ मध्ये केवळ तिकीटाच्या आमिषाने पुन्हा काँग्रेसमध्ये आलेल्या व्यक्तीला तिकीट देण्यात आल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. अशा संधीसाधू लोकांना प्राधान्य देत समर्पित कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने काँग्रेससोबत काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.