नरेश कदम
मुंबई : मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस, शरद पवार गटाला सोबत घेऊन लढविणार असून, पक्षश्रेष्ठींनी या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटासोबतच्या महाविकास आघाडीला मुंबईत चांगले यश मिळाले होते. मात्र, उद्धव ठाकरे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या. काँग्रेसचा दलित आणि मुस्लिम जनाधार उद्धव ठाकरे गटाकडे वळला. काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाने जागा जिंकल्या. त्यामुळे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा वाटू लागली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. स्थानिक कार्यकर्त्याला बळ देण्याची काँग्रेसची योजना आहे. मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत न जाता आपली व्होटबँक टिकविण्याची व्यूहरचना काँग्रेसने अवलंबल्याचे दिसून येते.
मुंबई आणि ठाणे, पुणे , नाशिक, कल्याण, डोंबिवली आदी महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे गटासोबत जायचे नाही, अशी भूमिका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. यावेळी स्थानिक काँग्रेसच्या भूमिकेप्रमाणे निर्णय घ्या, असे पक्षश्रेष्ठींनी कळविले आहे. काही महापालिकांमध्ये शरद पवार गटाला सोबत घेतले पाहिजे, असे स्थानिक काँग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यामुळे शरद पवार गटाला पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आदी महापालिकेच्या निवडणुकीत सोबत घेतले जाईल.
नागपूरला भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्र लढू शकेल, अशी चर्चा सुरू आहे. जेथे मनसेची ताकद नाही, तेथे महाविकास आघाडी एकत्र लढेल, असा अलिखित समझोता महाविकास आघाडीत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अडचणीच्या आहेत, असे काँग्रेस नेत्यांना वाटत असून, तिकडे जास्त लक्ष देण्यात येणार आहे.