वर्षा गायकवाड  pudhari photo
मुंबई

Varsha Gaikwad| दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही

वर्षा गायकवाड यांची भाषा बदलली : काँग्रेस स्वबळाकडून पुन्हा आघाडीकडे?; आमचे निर्णय राज ठाकरे घेतात : देशपांडे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत नकोच अशी भूमिका जाहीर करत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करणार्‍या काँग्रेसची भाषा बदलली असून, पावलेही आघाडीच्याच दिशेने पडू लागली आहेत.

मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी मान्य केला, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गेल्याच आठवड्यात मुंबईत झालेल्या कार्यकर्ता शिबिरात जाहीर केले. या निर्णयास राज ठाकरे कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ घातल्याने काँग्रेसने ठाकरे बंधूंपासून अंतर राखण्याचा निर्णय घेत स्वबळावर निवडणुका लढवण्याचे जाहीर केले. मात्र दुसर्‍याच दिवशी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड व अन्य पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेत आघाडी करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला. राष्ट्रवादी आमचा नैसर्गिक मित्र असल्याचे कारण देत पवारांसाठी स्वबळ बाजूला ठेवल्याचे हे नेते सांगत आहेत.

मनसे नकोच, असे उच्चरवाने सांगणार्‍या वर्षा गायकवाड यांची भाषा पुन्हा बदलली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाशी आघाडी करायची किंवा स्वबळावर जायचे याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेण्याचा प्रश्न नाही. आमच्यासाठी हा विषय संपला आहे. मात्र, दिल्लीवरून पक्षश्रेष्ठीचा आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, असे त्यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.

रिपाइंचे काही घटकही काँग्रेससोबत येण्यास इच्छुक आहेत. पण कायदा हातात घेऊन मारहाण करणारे, दडपशाही करणार्‍या पक्षांशी काँग्रेस आघाडी करणार नाही, असे त्या राज ठाकरे यांचा उल्लेख न करता म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार राज ठाकरे यांना सोबत घेण्यास अनुकूल आहेत. या संदर्भात दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी त्यांचे बोलणे झाल्याचे कळते. पवारांनी राज ठाकरेंचा आग्रह धरला तर दिल्लीतून निर्णय बदलू शकतो. त्यामुळेच वर्षा गायकवाड यांनी एकीकडे मनसे नकोच असे सांगताना दिल्लीहून आदेश आला तर मनसेलाही सोबत घेऊ, असे म्हणण्यास आता सुरुवात केली आहे.

निर्णय राज ठाकरे घेतील : देशपांडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाविकास आघाडीचा भाग नाही. आमचा पक्ष स्वतंत्र असून पक्षाचे निर्णय राज ठाकरे हे घेत असतात. त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धव ठाकरे काय बोलतात, ते दोघे एकमेकांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड शरद पवारांशी काय बोलतात याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमच्या पक्षाची भूमिका काय हे योग्य वेळी राज ठाकरे जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

सामाजिक स्वास्थ्य ढासळले

मतदार याद्या आल्या आहेत. आमच्याकडून मतदार तपासणी सुरू आहे. प्रत्येक शाखेत याद्यांवर काम सुरू आहे. त्यावर काय आक्षेप घ्यायचे ते आमचे पदाधिकारी करणार आहेत. आता पैसे वाटायचे आणि निवडून यायचे असे सत्ताधार्‍यांनी सुरू केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. राज्यात ज्या पद्धतीने निवडणुका होत आहे त्या शरमेने मान खाली घालवायला लावणार्‍या आहेत. एका महिलेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलिसांची सुरक्षा घ्यावी लागते. वर तिचा अर्ज रद्द केला जातो, तिथले विरोधक माझ्याविरोधात कुणीही उभे नाही हे अभिमानाने सांगतो, अशी लोकशाही महाराष्ट्राला अपेक्षित नाही. यापूर्वी युपी आणि बिहारमध्ये असे प्रकार घडत होते आता ते महाराष्ट्रात घडत आहे. राज्यातील सामाजिक स्वास्थ्य ढासळत चालल्याचे हे लक्षण असल्याचेही देशपांडे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT