जयंत पाटील  pudhari photo
मुंबई

Jayant Patil resignation : जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरुन गोंधळ

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खंडन; शशिकांत शिंदे यांच्याकडून सावध प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शरद पवार यांचे खासमखास मानले जाणारे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, या पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले आहे, तर शशिकांत शिंदे यांनी मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करेन, असे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी जणू जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर मोहोर उमटवली आहे. शरद पवार यांची मर्जी संपादन केल्यामुळे जयंत पाटील हे अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर आहेत, अशी चर्चा आहे.

यामुळे आपल्याला संधी मिळत नाही, अशी भावना झालेले पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना अजित पवार यांनी पाटील यांना पदावरून हटविण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण शरद पवार पाठीशी असल्यामुळे पाटील यांना जीवनदान मिळत गेले. मध्यंतरी, जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला पाटील यांचे विरोधकही खतपाणी घालत होते. तरीही ते पक्षात राहिले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये १० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आता मला प्रदेशाध्यक्षपदावरून मोकळे करा. ही जबाबदारी अन्य कोणावरही द्या, अशी विनंती जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासमक्ष केली होती; पण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत पदावर कायम राहा, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. तरीही त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्याकडे १५ जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.

चर्चा वायफळ : आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करून राजीनामा दिला नसल्याचा दावा केला आहे. जयंत पाटीलसाहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

संधी मिळाली तर आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करेन: शशिकांत शिंदे

शशिकांत शिंदे यांनी पाटील यांच्या राजीनाम्यावर जणू मोहोर उमटविली आहे. ते म्हणाले, पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग होत असते. नवीन लोकांना संधी देणे व त्यांच्याकडून नेतृत्व उभे करणे हा आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा गुण आहे. मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन. शरद पवार हे माझे दैवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करेन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT