पवन होन्याळकर
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डेटा सायन्स यांसारख्या अत्याधुनिक शाखांवर विद्यार्थ्यांनी अक्षरशः उड्या टाकल्या आहेत. प्रवेशाच्या तीन फेर्यांनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार या शाखांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. याउलट मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल यांसारख्या पारंपरिक शाखांकडे विद्यार्थ्यांनी काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण 1 लाख 76 हजार 95 जागांपैकी तीन फेर्यांमध्ये 95 हजार 523 प्रवेश पूर्ण झाले आहेत.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) घेतलेल्या तीन प्रवेश फेर्यांमधून विद्यार्थ्यांचा कल निश्चित झाला आहे. ‘कॉम्प्युटर किंवा एआयमध्ये इंजिनिअरिंग केले तरच आयटी क्षेत्रात नोकरी हमखास मिळेल’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी या शाखांना सर्वाधिक पसंती दिली आहे.
भविष्यातील नोकरीच्या संधी आणि वेगाने वाढणारी तंत्रज्ञानाची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी नव्या शाखा निवडण्यावर भर दिला आहे. विशेषतः एआय, मशिन लर्निंग आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रांमधील जागांवर प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली.
‘एआय अँड डेटा सायन्स’ आणि ‘एआय अँड मशिन लर्निंग’ या शाखांमधील उपलब्ध जागा जवळपास 100 टक्के भरल्या आहेत.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) या शाखांमध्येही सरासरी 60 टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले आहेत.
यांसारख्या विशेष शाखांमधील 80 टक्क्यांपेक्षा जास्त जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.