मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत चौथ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तुलनेने कमी होत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीत झालेल्या मोठ्या प्रमाणातील प्रवेशानंतर दुसरी, तिसरी फेरीनंतर चौथ्या फेरीतही प्रवेशात घट झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात आयटीआय प्रवेशासाठी 1 लाख 50 हजार 344 जागा उपलब्ध होत्या. यापैकी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी 1 लाख 36 हजार 926 जागांचा समावेश केला होता. रविवारी सायंकाळपर्यंत आयटीआयचे राज्यभरातून सर्व फेरीत 89 हजार 702 प्रवेश झाले. यात मुले 74 हजार 840 आहेत, तर 14 हजार 862 इतक्या मुलींनी प्रवेश घेतला आहे. 12 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑगस्ट सकाळी 9 पासून 19 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 पर्यंत संबंधित संस्थेत मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी व प्रत्यक्ष प्रवेशासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यात नव्याने पसंतीची जागा मिळाल्यास जुन्या संस्थेत प्रवेश रद्द करूनच नवीन प्रवेश निश्चित करावा लागेल.
पुणे ः 17,080, नाशिक ः 16,721, नागपूर ः 14,880, छत्रपती संभाजीनगर ः 13,906, अमरावती ः 13,399, मुंबई ः 12,916.