डाव्या चळवळीतील धडाडीच्या नेत्या कॉम्रेड प्रेमा पुरव यांचे आज मुंबईत निधन झाले File Photo
मुंबई

Prema Purav Death : 'अन्नपूर्णा'च्या कॉम्रेड प्रेमा पुरव यांचे निधन; गिरणी कामगारांसाठी वेचले आयुष्य

अन्नपूर्णा उद्योगातून दिला महिलांना आधार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : डाव्या चळवळीतील धडाडीच्या नेत्या कॉम्रेड प्रेमा पुरव यांचे आज पुण्यात निधन झाले. मुंबईतील गिरणी कामगारांचे आयुष्य सावरण्यासाठी प्रेमा पुरव अखेरपर्यंत कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

मृत्यूसमयी त्यांचे ८८ वय होते.त्यांच्या पाठीमागे तीन विवाहित मुली, तीन जावई, नातवंडे असा परिवार आहे.

पुणे येथील कर्वे पुतळ्या जवळील लुमावत अपार्टमेंट मध्ये त्या राहत होत्या.त्यांना डॉ.मेघा पूरव- सामंत,विशाखा पुरंदरे व माधवी पूलंकारी अशा तीन मुली आहेत. गेल्या काही दिवसापासून प्रेमाताई पुरव या घरीच होत्या. मंगळवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचे निधन झाले, अशी माहिती मुलगी डॉ.मेघा पूरव- सामंत यांनी दिली

प्रेमा पुरव यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, ती म्हणजे अन्नपूर्णा महिला मंडळ आणि अन्नपूर्णा उद्योग उभा करणाऱ्या प्रेमाताई अशी. प्रेमाताई या मुळच्या गोव्यातील होत्या. त्यांनी गोवामुक्ती आंदोलनात सहभाग घेतला होता, तसेच त्या गोमंतक पीपल्स पार्टीशी संबंधित होत्या. गोवा मुक्ती आंदोलनात क्रांतीकारकांना बाँब बनवण्यात मदत करण्यात त्यांचा सहभाग असे.

गिरणी कामगार युनियनसोबत काम

प्रेमाताई नंतर कम्युनिस्ट पार्टीशी जोडल्या गेल्या. आधी गोवा, बेळगाव येथे काम करून त्या मुंबईत पोहोचल्या. तेथे गिरगावमध्ये काम करताना फैफी आझमी, बलराज सहानी, अण्णा भाऊ साठे यांच्यासोबतही काम केले. त्यांनी नंतर गिरणी कामगार युनियनसोबत काम सुरू केले. कम्युनिस्ट पक्षाचा महत्त्वाचा भाग असलेल्या स्टडी सर्कलमध्येही त्या कार्यरत होत्या. या काळात त्यांचा विवाह बॅंक कर्मचारी नेते महेंद्र दादा पुरव यांच्याशी झाला

अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना

गिरणी कामगारांची मीटिंग संपली की त्या कामगारांच्या घरी जात आणि कामगारांच्या घरातील महिलांची परिस्थितीत समजून घेत. त्यातून पुढे अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना झाली.

बायकांना मारहाण होता कामा नये, यासाठी संघटनेचे बळ देणे, बलात्कार झालेल्या स्त्रियांना आधार देणे, वेश्यांच्या मुलींना आधार देऊन त्यांना स्वावलंबी करणे, अशी अनेक कामे अन्नपूर्णाद्वारे करण्यात आली. महागाई प्रतिकार समितीत अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे यांच्यासह प्रेमाताई आघाडीवर होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT