मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.  File Photo
मुंबई

शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी समिती; CM शिंदेंची घोषणा

Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse | 'पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी'

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या (Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse) दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल गुरुवारी (दि.२८) 'वर्षा' निवासस्थानी बैठक झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. पण भविष्यात अशा दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

राजकोट येथे शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही समिती जबाबदारी निश्चित करणार आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ॲडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.

ठाकरे- राणे समर्थकांत राडा, नेमकं काय घडलं?

राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा जिथे कोसळला त्या घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि खा. नारायण राणे एकाच वेळी आल्यानंतर बुधवारी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले. घोषणा आणि इशारे सुरू झाल्यामुळे वातावरण खूपच तापले. काहीजणांना मारहाणही झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही बाजूंकडील नेते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्यामुळे तासभर हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी कडे करून राणे समर्थकांना एका बाजूला घेतले आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर हा राडा थंडावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT