मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.  File Photo
मुंबई

धनगर समाजास एसटी आरक्षण जीआरच्या मसुद्यासाठी समिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी धनगर आणि धनगड या जाती एकच असल्याचा शासन आदेश (जीआर) काढण्यासाठी तीन आयएएस अधिकारी आणि धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल, असे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व त्यांची विचारपूसही केली. बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव गणेश पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल. यासंदर्भात सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्याचे महाधिवक्ता, विधी आणि न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे तीन सचिव तसेच समन्वय समितीच्या पाच सदस्यांची समिती नेमली जाईल. त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

लवकर अहवाल देण्याचे निर्देश

धनगर आणि धनगड जातीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. सुधाकर शिंदे समितीलाही शक्य तेवढ्या लवकर अहवाल देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या समितीला त्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या धर्तीवर लागू असलेल्या योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात समावेश असलेले आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, रामहरी रुपनवर, रामराव वडकुते यांच्यासह समन्वय समितीचे पांडुरंग मेरेगळ, विजय गोफने, पंकज देवकते, मधू शिंदे यांनी विविध मुद्दे मांडले. माजी मंत्री महादेव जानकरही बैठकीस उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT