मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई किनारी रस्ता (उत्तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी आवश्यक त्या विविध परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर मार्गरेषेने बाधित होणार्या आवश्यक त्या जमिनीचे संपादन आणि शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
मुंबई किनारी रस्ता (उत्तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्प अंतर्गत कांदळवन वळतीकरण प्रस्तावास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून नुकतीच तत्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच प्रकल्प स्थळास प्रत्यक्ष भेट दिली. तसेच, होऊ घातलेल्या कामांची पाहणी करत आढावा घेतला.
यात पश्चिम उपनगरातील मालाड मरिना एन्क्लेव्ह, चारकोप येथील सेक्टर 8, गोराई क्षेपणभूमी, गोराई खाडी परिसर, एक्सर मेट्रो स्थानक परिसर, कांदळपाडा मेट्रो स्थानक परिसर, दहिसर (पश्चिम) येथील आनंद पार्क या ठिकाणांचा समावेश आहे.
या दरम्यान पॅकेज सी आणि डी अंतर्गत माईंडस्पेस मालाड ते चारकोप खाडी दरम्यान उत्तर दिशा आणि दक्षिण दिशेने जाणार्या बोगद्याची बांधणी केली जाणार आहे. या अंतर्गत चारकोप येथे खाचकाम स्थळ आहे. कार्यस्थळाचे पोहोच रस्ते, बोगदा खनन संयंत्र तसेच कट अँड कव्हर भागांची जुळवणी याच ठिकाणी केली जाणार आहे. तसेच, बोरसापाडा येथे रस्त्याचे नियमित रेषेने रूंदीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणांची पाहणी करत बांगर यांनी प्रत्यक्ष कामाचे नियोजन करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
पॅकेज ई अंतर्गत चारकोप खाडी ते गोराई आंतरमार्गिका (उन्नत मार्ग) तसेच पॅकेज एफ अंतर्गत गोराई आंतरमार्गिका ते दहिसर आंतरमार्गिका (उन्नत मार्ग) प्रस्तावित आहे. तसेच पॅकेज एफ अंतर्गत बोरिवली येथील देविदास मार्गावर 800 मीटर लांबीच्या सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील भागामध्ये प्रत्यक्षात कामे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच बोरिवली येथील देविदास मार्गाकडून कार्यस्थळाकडे जाणार्या रस्त्यासाठी जलदगतीने भूसंपादन करावे, असे निर्देशही बांगर यांनी दिले.