मुंबई

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; पावसामुळे सप्टेंबरनंतरच होणार प्रक्रिया

Shambhuraj Pachindre

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरअखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या सहकार विभागाने याबाबत गुरुवारी आदेश पारित केले आहेत.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्य शासनास पाठविलेल्या पत्रानुसार 2024-25 या वर्षात राज्यातील 24 हजार 710 सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असल्याचे कळविले आहे. त्यापैकी 8 हजार 305 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. परंतु राज्यातील 14 जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीच्या 100 टक्केपेक्षा जास्त व 5 जिल्ह्यात सरासरीच्या 70 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व इतर अनुषंगिक शेतीविषयक कामात व्यस्त आहे. अशा शेतकर्‍यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बाकी आहे अशा सहकारी संस्थांना यामधून वगळण्यात आले आहे. अन्य सहकारी संस्थांची निवडणूक आहे त्या टप्प्यावर थांबविण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

SCROLL FOR NEXT