मुंबई/पुणे : CNG Price | थर्टी फर्स्टची झिंग चढण्यापूर्वीच मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या दरांत एक रुपयाने वाढ करण्यात आली असून, आता ७७ रुपयांऐवजी ७८ रुपये किलोने सीएनजी भरावा लागेल. दरम्यान, ऑटो रिक्षाचे दर तीन रुपयांनी वाढवण्याची मागणी आम्ही नव्या सरकारकडे करणार असल्याचे मुंबई रिक्षा युनियनचे थंपी कुरियन यांनी सांगितले.
अवघ्या दोन महिन्यांत महानगर गॅस लिमिटेडने ही तिसरी दरवाढ केली आहे. यापूर्वी २४ नोव्हेंबरला किलोमागे २ रुपयांची वाढ झाली होती. दरवाढीचा हा झटका बसताच सीएनजीवर धावणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षांचे दर भडकण्याचे संकेत आहेत. मुंबई महानगर प्रदेशात टॅक्सी-रिक्षाचा किमान दर २३ वरून २६ रुपये करण्याची मागणी आता ऑटो युनियन करणार असल्याचे समजते. शनिवारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनेही पुण्यात सीएनजीचे दर १ रुपया १० पैशांनी वाढवले. मुंबईच्या तुलनेत पुण्यात चढ्या दराने म्हणजे ८९ रुपये किलोने सीएनजी भरावा लागेल. ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम आहे. नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि बाजाराच्या दरावर आधारित वायुपुरवठा यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत सीएनजी तीन रुपयांनी महागला असला तरी पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजी वापरल्याने अनुक्रमे ४९ टक्के आणि १४ टक्के बचत होते, असा महानगर गॅसचा दावा आहे. सीएनजी दरवाढीचे हे लोण आता मुंबई, पुणेपाठोपाठ दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्येही दाखल होण्याची शक्यता आहे.