मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अपात्र लाभार्थीकडून पैसे परत घेण्याबाबतचा सरकारने निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणूक संपल्यामुळे राज्य सरकार अपात्र बहिणीकडून पैसे परत घेणार असल्याच्या चर्चेचे तटकरे यांनी बुधवारी खंडन केले. त्या म्हणाल्या, राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून या योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. मात्र, लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत. मात्र आतापर्यंत आम्ही एकाही महिलेचे पैसे माघारी घेतलेले नाहीत किंवा हे पैसे परत घेण्याविषयी कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. काही महिलांनी नोकरी, नवीन गाडीची खरेदी, परराज्यात स्थलातंर आदी कारणांनी योजनेसाठी अपात्र ठरत असल्याने पैसे माघारी करण्यासाठी स्वतःहून शासनाला अर्ज केलेले आहेत. दररोज पाच-सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क करून कुठलीही माहिती अजून मागवलेली नाही.
एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग ते पैसे जमा करण्यासाठी खिडकी तयार करून देतील. तेथे हे पैसे जमा होतील. आम्ही कोणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही. ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून त्यांना दिलेल्या रकमेची वसुली करणार असल्याचे अदिती तटकरे यांनी मंगळवारीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.