मुंबई : महाराष्ट्रात २० लाख घरांसाठी परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यातून महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने २० लाख घरांना मंजूरी दिली आहे. यामधील १०,२९,९५७ घरे २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात वाढ करण्यात आली आहेत.
आतापर्यंत ३३ लाख घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूरी मिळाली आहे. आता ही वाढीव घरांना मंजुरी मिळाल्याने एकूण 44,70,829 इतकी घरे महाराष्ट्राला मंजूर झाली आहेत. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम’ पार पडला. या कार्यक्रमावेळी काही निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की. १ एप्रील २०१६ पासून देशात प्रत्येकाला घर या घोषणेप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना अगदी यशस्वीपणे राबविली जात आहे. त्यामध्ये भारताच्या ग्रामीण भागात २ कोटी घरे बांधण्याचे उद्दीष्ट आहे. २०२९ पर्यंत या योजनेला मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत ३३, ४०, ८७२ घरे मंजूर आहेत. आता यावर्षीच्या कॅबीनेट मिटींगमध्ये अजून १० लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेमध्ये घर मिळण्याासाठी अर्जदाराचे नाव सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना यादीत असणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबांकडे घर नाही किंवा अगदी छोटे १ किंवा २ खोल्यांचे कच्चे घर आहे, ते पात्र आहेत. त्याचबरोबर घर नसलेल्यांना या योजनेत प्राधान्य आहे. तसेच आदिवासी, मजुर, अपंग किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय कुटुंबासाठी या याजनेत घर मिळण्यासाठी प्राधान्य दिले जाते.