मुंबई : 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही शिवसेनेला 147 जागा देण्यास तयार होतो आणि भाजपने 127 जागा लढवाव्यात असे सूत्र तयार करण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे 151 जागांवर अडून बसले आणि या निवडणुकीत युती तुटली असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका कार्यक्रमात केला.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांचा सत्कार मुंबईत आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. जागा वाटपाच्या चर्चेत ओमप्रकाश माथूर यांनी भाजपचे नेते अमित शहा यांच्याशी सातत्याने संवाद साधला होता. अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भातील तपशील देत होते. नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच 127 जागा भाजपला आणि 147 जागा शिवसेनेला असे सूत्र ठरले, असे फडणवीस यांनी सांगितले.
ठरलेल्या सूत्रानुसार निवडणूक लढवली तर युतीला 200 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास आम्हाला होता. असे सांगून फडणवीस म्हणाले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि मी मुख्यमंत्री झालो. असे ते म्हणाले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी शिवसेना-भाजपची युती तुटू नये, असे देवेंद्र फडणवीस यांचे मत होते. तेव्हा युतीसाठी फडणवीस यांची भूमिका सकारात्मक होती; पण भाजपचा वरून जो कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटल्याचा गौप्यस्फोट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांची बाजू घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांचे कौतुक करतानाच आज तुमच्याकडे सत्ता आहे, पण बहुमत फार चंचल असते, कधी इकडे-तिकडे सरकेल सांगता येत नाही. मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या होत्या, असा टोलाही राऊतांनी फडणवीस यांना लगावला. नाशिक दौर्यावर आलेल्या खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, युती तोडायची ठरले होते. फक्त चर्चेचे नाटक करून युती तोडण्यात आली.