Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाकावर येण्यासाठी दिलेली ऑफरच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता या गोष्टी खेळीमेळीत होत असतात, त्या खेळीमेळीतून घ्याव्या लागतात, अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा शिंदे शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आज (दि.१६) संयुक्तपणे केली. यावेळी मी मोठी ऑपरेश करतो, या शिंदे यांच्या विधानाचा खरपूस समाचार करताना ठाकरे म्हणाले की, त्यांना माझ्या एवढा ऑपरेशनचा अनुभव नाही. मी अशी छोटी मोठी ऑपरेशन करत नाही. मी मोठी ऑपरेशन करतो, असा टोला शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
ते पुढे म्हणाले की, सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो, ही वडिलांची आणि आजोबांची कृपा आहे. आमची काय परिस्थिती होती, हे त्यांनाही माहीत आहे. परंतु, ज्यांना सोन्याच्या चमच्यातून भरविले, त्यांनी प्रतारणा केली, हे जनता विसरू शकणार नाही. त्यांनी खाल्या ताटावर प्रतारणा केली, हे लोक ओळखून आहेत. आरोप करायचे आणि त्यांना भाजपमध्ये घ्यायचे, असे सध्या राज्यात सुरू आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यास आरोप मागे घ्यायचे. यांना भ्रष्टाचार मुक्त भाजप नाही करायचा आहे. तर भ्रष्टाचार युक्त भाजप करायचा आहे, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ झाला. यावेळी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, उद्धव ठाकरेंना सत्ताधारी बाकावर येण्याची थेट ऑफरच दिली. ''उद्धवजी २०२९ पर्यंत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही. तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा...स्कोप आहे इथे..आपण वेगळ्या पद्धतीने बोलू,'' असे फडणवीस हसत हसत म्हणाले.