मुंबई : राज्यात काही भागांत निर्माण झालेल्या इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सध्या शेतीचा हंगाम तोंडावर असल्याने डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्यांनी पेट्रोल-डिझेल, विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालावे. कोणत्याही स्तरावर इंधनाची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही, यावर प्रशासनाने बारीक लक्ष ठेवावे. जर कोण साठेबाजी करीत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
‘अल-निनो’च्या संकटामुळे उद्भवणार्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारचा ‘अॅक्शन प्लॅन’ पूर्णपणे तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यातील इंधनाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही विशिष्ट भागांत इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, ही वस्तुस्थिती असली तरी ही समस्या सर्वदूर नाही. एखादी घटना घडल्यास तिचा मोठा गाजावाजा होतो; मात्र जनतेने घाबरण्याचे कारण नाही.
‘अल निनो’मुळे यंदा वेगवेगळ्या टप्प्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत पावसाचा तीव्र तुटवडा जाणवू शकतो. या नैसर्गिक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने आधीच एक व्यापक आराखडा तयार केला असून, नागरिकांना आणि शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
इंधनटंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असून, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पॅनिक होऊन लोकांकडून गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.